Mahayuti : निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; कोण कुठे लढणार? जाणून घ्या सविस्तर…

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC Election 2025) महायुती एकत्र लढणार असून, इतर महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत. मात्र, निवडणूक निकालानंतर तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना याबाबत संकेत दिले आहेत. मुंबईतील श्रीमंत महानगरपालिकेची निवडणूक सर्व पक्षांसाठी महत्त्वाची आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या युतीला आव्हान देण्यासाठी महायुतीने मुंबईत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. इतर ठिकाणी स्वबळावर लढण्याची रणनीती आखली असून, गरजेनुसार युतीचा निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस म्हणाले.
ठाणे महानगरपालिकेतील राजकीय चित्र
ठाणे महानगरपालिकेत 2017 मध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले होते. शिवसेनेने 67 नगरसेवकांसह बहुमत मिळवले होते, तर भाजपला 23 जागांवर समाधान मानावे लागले होते. सध्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणांनुसार, शिवसेनेच्या शिंदे गटाकडे 85 माजी नगरसेवक, तर भाजपकडे 23 माजी नगरसेवक आहेत.
ठाण्यात शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढल्यास मतविभाजनाचा धोका आहे, ज्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. सध्याच्या घडीला भाजपचे आमदार संजय केळकर आणि गणेश नाईक यांच्यामुळे शिंदे गटावर दबाव आहे. त्यामुळे ठाण्यातील निवडणूक महायुतीसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.





