महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांच्या हाता-पायाला फ्रॅक्चर; प्रचार थांबला; नेमकं काय घडलं?

Vilas Bhumre | विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचारसभांनी आता वेग धरला आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना आता महायुतीमधील एका उमेदवाराबाबतचे वृत्त समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विलास भुमरे हे पाचोड येथील आपल्या निवासस्थानी आज पहाटे भोवळ आल्याने गॅलरीमधून खाली पडले. यात ते जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांचे पुढील नियोजित दौरेही रद्द करण्यात आले आहे.
विलास भुमरे आज पहाटे फोनवर बोलत असताना अचानक चक्कर येऊन पडल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या डाव्या हाताला आणि पायाला चार ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आज ऑपरेशन केलं जाणार आहे.
निवडणुकीच्या प्रचारात वेळेवर जेवण आणि झोप होत नसल्याने त्यांना चक्कर आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र चक्कर येऊन पडल्याने त्यांना दुखापत झाल्याने आता त्यांना प्रचार करता येणार नाही. परंतु सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
कोण आहेत विलास भुमरे ?
खासदार संदिपान भुमरे यांचे विलास भुमरे पुत्र आहेत. विलास भुमरे यांनी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेत बांधकाम सभापतीपद सांभाळले आहे. पैठण विधानसभा मतदारसंघातून विलास भुमरे यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
विलास भुमरे यांची लढत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दत्ता गोर्डे यांच्याशी होणार आहे. त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र आता प्रचारासाठी काही दिवस शिल्लक असतानाच त्यांना दुखापत झाल्याने प्रचार बंद करावा लागणार आहे.
हेही वाचा:
एका पदासाठी ६ दावेदार ; राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोणत्या नेत्याचे पारडे जड?, वाचा सविस्तर





