छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीबाणीला उद्धव ठाकरेच जबाबदार; संदीपान भुमरे यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीप्रश्रावर आदित्य ठाकरे मोर्चा काढणार आहेत. परंतु आजच्या या पाणीबाणीला उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात काही चुका झाल्या, त्यामुळेच पाणी योजनेच्या कामाला उशीर झाला, असा आरोप शिवसेनेचे नेते आणि खासदार संदीपान भुमरे यांनी केला आहे.
शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अजूनही अपूर्णच आहे. दुसरीकडे जुनी पाईपलाईनही सतत फुटत असल्याने मागील महिनाभरापासून शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाने शहरात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या नियोजित मोर्चाच्या मुद्यावरून खासदार संदीपान भुमरे यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
संदीपान भुमरे म्हणाले, शहराच्या पाणी योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच शहरवासीयांना मुबलक पाणी मिळणार आहे. ते माहिती असल्याने आता आदित्य ठाकरे मोर्चा काढत आहेत, पाणीप्रश्नाचे श्रेय घेण्यासाठी हा प्रयत्न आहे. परंतु आदित्य ठाकरे यांनी मोर्चा काढण्याआधी ही योजना का लांबली याची माहिती घ्यावी. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच योजनेत अडथळे आले. काही चुका झाल्या. त्यामुळे ही योजना लांबली. त्यामुळे तेच आजच्या पाणीबाणीला जबाबदार आहेत, असा आरोप भुमरे यांनी केला.
आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हंडा मोर्चा
जायकवाडी धरणात मुबलक पाणी असतानाही सत्ताधारी भाजप मिंधेगटाच्या लोकप्रतिनिधींकडून होणारे दुर्लक्ष आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शहरातील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. बारा ते पंधरा दिवस उलटूनही पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाकडून तारीख पे तारीख जाहीर केली जात आहे. शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून पाण्यासाठी महिनाभरात शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हंडा मोर्चा काढला जाणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.





