Maharashtra Cabinet Minister Formula : राज्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला आला समोर; कुणाला किती मंत्रीपदं मिळणार?

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २० दिवस उलटले आहेत. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र अद्याप या सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही. मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? याबाबत विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. यादरम्यान आता राज्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला आला समोर आला आहे.
काय आहे फॉर्म्युला?
महायुतीच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला समोर आला आहे. २३-१२-०९ हा या फॉर्म्युल्यावर महायुतीच्या तिन्ही पक्षाकडून शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. तसेच उद्याच मंत्रीमंडळाचा शपथविधी होऊ शकतो, असेदेखील समोर आले आहे.
या फॉर्म्युल्यानुसार भाजपला एकूण २३ मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे.यात भाजपकडे १८ कॅबिनेट मंत्रीपदं तर ५ राज्यमंत्री असणार आहेत. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाला १२ मंत्रीपदांवर समाधान मानावं लागणार आहे. शिंदेंना ९ कॅबिनेट तर ३ राज्यमंत्रीपदं मिळणार असल्याची माहिती आहे.
तर दुसरीकडे, ४१ आमदार निवडून आणणाऱ्या अजित पवार गटाला मात्र अवघी ९ मंत्रीपदं मिळणार आहेत. ज्यात ८ कॅबिनेट तर १ राज्यमंत्रीपद असणार आहे. या मंत्रीमंडळात भाजपचा वरचष्मा असणार आहे.
कधी होणार शपथविधी ?
नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार होईल, असं युतीच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र अद्याप या बाबतची कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.





