Pune District : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महावितरणचा शॉक

लाखणगाव : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महावितरणने शॉक दिला आहे. एकीकडे सरकार अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा करते तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे वीज बिल न भरल्यामुळे वीज कलेक्शन तोडून शेतकऱ्याची क्रूर थट्टा करत असल्याचा प्रकार आंबेगाव तालुक्यात सुरू झाला आहे.
महावितरण कंपनीने आंबेगाव तालुक्यातील घोडनदी-मीना काठावरील वीजबिल थकलेल्या साडेसात एचपीच्या पुढील शेती पंपांचे वीज कनेक्शन कट करण्याची कारवाई केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. शेती पंपाचे वीज कनेक्शन कट होत असल्याने हजारो शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे.
सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत असून शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी साडेसात एचपीपर्यंतच्या विद्युत मोटारींचे लाईट बिल माफ केले व पुढेही या मोटारींना मोफत वीज देण्याचे पाऊल उचलले. परंतु दहा एचपी,पंधरा एचपी व वीस एचपीच्या शेती पंपाच्या मोटारींचे वीजबिल माफ केले नाही. त्यामुळे साडेसात एचपीच्या पुढील शेती पंपाच्या मोटारीची वीजबिलाची रक्कम मोठ्या प्रमाणावर थकली असून महावितरण कंपनीने वीजबिल थकलेल्या मोटारींचे कनेक्शन कट करण्याची कारवाई केली आहे. शेती पिकांना बाजारभाव नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.
चौकट : आंदोलनाचा इशारा
शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांची व्याख्या व्यवस्थित न करता सरसकट साडेसात एचपीपर्यंत वीजबिल माफ केले व तेथून पुढे अनेक अल्पभूधारक शेतकरी शेती पंप वीज बिलाच्या बोजात अडकला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेती पंपाचे कनेक्शन कट करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन केले जाणार आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला.
प्रचंड पावसामुळे शेती पिके हातातून गेली. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याऐवजी त्यांच्या शेती पंपाची वीज कनेक्शन कट करून शेतकऱ्यांची सरकारने थटा सुरू केली आहे.
– सुरेश भोर,अध्यक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, पुणे जिल्हा.गेल्या चार महिन्यांपासून पडणाऱ्या पावसाने आधीच शेतकऱ्यांची शेती पिके सडून गेली. त्याला मदत करण्याचे सोडून शेती पंपाची वीज कनेक्शन तोडून शेतकऱ्र्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम सरकारने सुरू केले आहे.
– कान्हू करंडे, माजी सरपंच, काठापूर.राज्यभरात महावितरण कंपनीच्या माध्यमातून साडेसात एचपीपेक्षा जास्त एचपी असणाऱ्या वीज मोटारींचे बिल थकले आहे.अशा मोटारींचे कनेक्शन बंद केले आहे. शेतकऱ्यांनी चालू वीज बिल व जुन्या थकलेल्या वीज बिलाची काही रक्कम भरावी व वीज पुरवठा सुरळीत करुन महावितरण कंपनीस सहकार्य करावे.
– नितेश भसारकर,सहाय्यक अभियंता, महावितरण निरगुडसर.





