महाविकास आघाडी सरकार अपघाताने आले…

डोर्लेवाडी -खासदार संजय राऊत यांच्या विधानांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. केवळ अनिल देशमुख अपघाताने आले असे म्हणता येणार नाही, तर संपूर्ण महाविकास आघाडी सरकारच अपघाताने आले आहे. असा टोला नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. बारामती येथील भाजप कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद मला दिले, मात्र महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीवरील प्रभुत्व कमी झाले आहे. त्यांनी संचालक मंडळ रद्द केले. यामुळे मोकळ्या मनाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करावे म्हणून मी शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केला. मराठा समाजाच्या आरक्षण समितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना बदलून एकनाथ शिंदेंना आणा अशी माझी भूमिका होती.
माथाडी कामगार संघटनेच्या विषयात मला विचारले जात नव्हते, मला मराठा आरक्षण समितीत जाणीवपूर्वक शिवसेनेकडून डावलण्यात येत होते. माझी शिवसेनेत घुसमट होत होती. त्यामुळेच मी भाजपामध्ये प्रवेश केला असल्याचा खुलासा नरेंद्र पाटील यांनी यावेळी केला.
सचिन वाझेला मुख्यमंत्री पाठीशी घालत होते. सर्व पोलीस यंत्रणेमध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतो, हे उघड होऊ लागले आहे. महाविकास आघाडी सरकारचे पोलीस विभागावर योग्य नियंत्रण नसल्याचा आरोप नरेंद पाटील यांनी यावेळी केला आहे.





