Raj Thackeray : ‘भाजप विरोधातील मतांचा महाविकास आघाडीला लाभ’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले….

Mahavikas Aghadi | Raj Thackeray – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीला भाजपच्या विरोधातल्या मतांचा लाभ झाला. मोदी आणि शहांच्या विरोधातील मते महाविकास आघाडीला मिळाली याचा अर्थ महाविकास आघाडीचा जनाधार वाढला आहे असे नव्हे असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
आज येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना ठाकरे यांनी पुढे दावा केला की, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षांना सत्ताविरोधी मते मिळणार नाहीत.
दलित आणि मुस्लिमांच्या मोठ्या समुहाने भाजपच्या विरोधात मतदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधातील ही मते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसला गेली. ही महाविकास आघाडीला मिळालेली मते नव्हती. लाट आता निघून गेली आहे,असे ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत मनसे २२५ जागा लढवणार असल्याचेही ठाकरे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका करताना, राज ठाकरे यांनी दावा केला की पवारांनी राज्यात जातीचे आणि पक्षांतराचे राजकारण आणले. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर संतांचीही जातीच्या आधारावर विभागणी झाली, असा आरोप ठाकरे यांनी केला.





