केंद्रातील राज्यकर्त्यांकडून महात्मा गांधींचा वारसा धोक्यात – सोनिया गांधी

बेळगाव – महात्मा गांधी हे आमच्यासाठी प्रेरणेचे मूळ स्त्रोत आहेत आणि कायम राहतील. मात्र, त्यांच्या वारशाला केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून धोका निर्माण झाला आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरूवारी सोडले. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत सोनिया सहभागी होऊ शकल्या नाहीत. त्यांचा संदेश बैठकीत वाचून दाखवण्यात आला.
“Mahatma Gandhi’s legacy is under threat from those in power in Delhi” pic.twitter.com/kV3fK2caaN
— Congress (@INCIndia) December 26, 2024
सोनियांनी त्यांच्या संदेशातून मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकेची झोड उठवली. महात्मा गांधी बेळगावमधील अधिवेशनात कॉंग्रेसचे अध्यक्ष बनले. ती घडामोड पक्षाला आणि स्वातंत्र्यलढ्याला वेगळ्या वळणावर नेणारी ठरली. तसेच, देशाच्या इतिहासातील महत्वपूर्ण आणि परिवर्तनदायी घटना ठरली.
मात्र, देशाच्या स्वातंत्र्यासाठी कधीच न लढलेल्या संघटनांनी महात्मा गांधींना तीव्र विरोध केला. त्यांनी निर्माण केलेल्या विखारी वातावरणाची परिणती गांधीजींच्या हत्येत झाली. गांधीजींच्या मारेकऱ्यांचा महिमा गाण्यात आला, असे भाष्य त्यांनी केले. देशभरातील गांधीवादी संस्थांना लक्ष्य केले जात आहे. तसे करणाऱ्या शक्तींचा मुकाबला पूर्ण ताकदीने आणि दृढ निश्चयाने करणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे, असे आवाहन सोनियांनी कॉंग्रेसजनांना केले.





