Mahashivratri : देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिभावाने साजरा होत असताना मंदिरांमध्ये आणि सोशल मीडियावर भगवान शंकरावरील गाणी घुमताना दिसत आहेत. त्यातलं एक गाणं आजही विशेष ठरतं ते म्हणजे, ‘नमो नमो..’. हे गाणं ‘केदारनाथ’ या चित्रपटातील असून, ते दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. YouTube वर या गाण्याला तब्बल 95.7 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. केदारनाथच्या बर्फाच्छादित दऱ्या, निसर्गरम्य दृश्यं आणि सुशांतची भावनिक अभिव्यक्ती यामुळे हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र या यशामागे एक वेदनादायी आठवण दडलेली आहे सुशांत आज आपल्यात नाहीत. ‘केदारनाथ’ आणि सुशांतचा प्रभावी अभिनय : २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘केदारनाथ’ चित्रपटात सुशांतने मन्सूर ही भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत अभिनेत्री सारा अली खान हिने मुख्य भूमिका केली होती. चित्रपटाची कथा २०१३ मधील उत्तराखंड पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आधारित होती. प्रेमकथा आणि नैसर्गिक आपत्ती यांचा संगम असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सुमारे १०२.७७ कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘नमो नमो’ हे गाणं विशेषतः महाशिवरात्रीच्या काळात मोठ्या प्रमाणावर ऐकले जाते. भगवान शंकरावरील श्रद्धा आणि अध्यात्मिक भावनेने ओतप्रोत असलेलं हे गाणं आजही भक्तांच्या प्लेलिस्टमध्ये अग्रस्थानी आहे. छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यापर्यंत प्रवास : सुशांतने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली. ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेनंतर ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. बॉलिवूडमध्ये त्याने २०१३ साली काय पो छे! या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘छिछोरे’, ‘डिटेक्टिव ब्योमकेश बक्षी’ अशा विविध भूमिकांमधून त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली. विशेषतः एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. १४ जून २०२० काळजाला चटका लावणारा दिवस : १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूत यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश हादरला होता. मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. विविध तपास यंत्रणांकडून चौकशी झाली अनेक कलाकारांची चौकशी करण्यात आली. आज त्यांच्या निधनाला पाच वर्षे उलटली असली तरी चाहत्यांच्या मनातील त्यांची जागा कायम आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो, व्हिडिओ आणि संवाद आजही व्हायरल होत असतात. आजही जिवंत असलेली आठवण : महाशिवरात्रीच्या निमित्ताने ‘नमो नमो’ पुन्हा एकदा घुमत असताना, सुशांत सिंह राजपूत यांची आठवण चाहत्यांच्या मनात दाटून येते. छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यापर्यंत झेपावलेला हा अभिनेता अनेक स्वप्नं पूर्ण करण्याआधीच निघून गेला. पण त्याचा अभिनय, त्याची स्मितरेषा आणि त्याने साकारलेल्या भूमिका या सगळ्यांमुळे तो आजही प्रेक्षकांच्या हृदयात कायम जिवंत आहे. हे देखील वाचा… Jaish-e-Mohammed : जैश-ए-मुहम्मदच्या निशाण्यावर शहरी महिला; महिला विंगची स्थापना करणार