Mahashivratri : महाशिवरात्री निमित्त ‘त्रिवेणीश्वर’ला भाविकांची मांदियाळी; ‘हर हर महादेव’च्या गजराने परिसर दुमदुमला !

नेवासा – प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव-सुरेशनगरच्या मध्यावर असलेल्या श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर येथे महाशिवरात्री निमित्त दिवसभरात सुमारे तीन लाख भाविकांनी स्वयंभू त्रिवेणीश्वर महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी केलेल्या “हर हर महादेव”च्या गजराने त्रिवेणीश्वर परिसर दुमदुमला होता.
महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर येथे पंचदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कालावधीत हजारो भाविकांनी आयोजित धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला. महाशिवरात्री निमित्त पहाटेच्या सुमारास घंटा व शंखाच्या निनादात व वेदमंत्राच्या जय घोषात भगवान त्रिवेणीश्वर महादेवास त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत स्वामी रमेशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रूद्राभिषेक घालण्यात आला.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून त्रिवेणीश्वर भक्त मंडळाच्या सेवेकऱ्यांनी व तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावत विशेष योगदान दिले. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी लावून त्रिवेणीश्वराचे दर्शन घेतले.
महाशिवरात्री निमित्ताने पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. दुपारच्या सत्रात सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उध्दवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांचे हरिकीर्तन झाले. तर रात्री ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी किर्तन सेवा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली
महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुख्य प्रवेशद्वारापासून त्रिवेणीश्वर देवस्थानकडे येणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. विविध दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्याने मोठी यात्रा मंदिर प्रांगणात भरली होती. दुपारी शालेय विदयार्थ्याचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. तर शिवशाहीर नानासाहेब कोलते यांचा शिवचरित्रावर पोवाडा कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.





