Asian Track Cycling Championships : भारतीय संघात महाराष्ट्राच्या साहील, झायना, मयुरी, सुशिकला, पूजाची निवड…

पुणे :- नवी दिल्ली होत असलेल्या ४३ व्या सिनीअर आणि ३० व्या ज्युनिअर आशियाई ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी होणा-या भारतीय संघात महाराष्ट्राच्या साहील शेटे, झायना पिरखान, मयुरी लुटे, सुशिकला आगाशे आणि पूजा दानोले यांची निवडझाली आहे. या स्पर्धा आयजी स्टेडियममधील इंनडोअर स्टेडियममध्ये २१ ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत.
राष्ट्रीय पदक विजेते साहिल शेटे आणि झायना पिरखान फिनीक्स सायकलिंग अकॅडमीमध्ये दर्शन बारगुजे यांच्या मार्गदर्शनाखाली चार वर्षांपासून सराव करत आहेत. साहिल पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयात १२ वी वाणिज्य मध्ये शिकत आहे. झायना पिरखान पालघर जिल्ह्यामधील नालासोपारा येथील राहुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये १२ वी वाणिज्य मध्ये शिकत आहे.
सुशिकला आगाशे आणि मयुरी लुटे भंडारा जिल्ह्यातील तर पूजा दानोले कोल्हापूर जिल्ह्यामधील खेडेगांवामधून आलेल्या आहेत. या तिघींची सायकलिंग खेळची सुरुवात पुणे येथील महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीमधून झाली. सुरुवातीला सायकलिंगचा सराव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दिपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केला.
World Table Tennis Team C’Ships 2024 : स्टार खेळाडू मनिकाच्या कामगिरीने भारताची उझबेकीस्तानवर मात…
राष्ट्रीय स्पर्धामधील पदकविजेत्या कामगिरीनंतर या तिघींची निवड राष्ट्रीय अकॅडमीसाठी झाली. गत चार वर्षांपासून आगाशे, लुटे आणि दानोले नवी दिल्ली येथे सराव करीत आहेत. साहील शेटे, झायना पिरखान, मयुरी लुटे, सुशिकला आगाशे आणि पूजा दानोले यांच्या भारतीय संघामधील सहभागाबद्दल भारतीय सायकलिंग महासंघाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, सायकलिंग असोसिएश ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अड विक्रम रोठे, सचिव प्रा. संजय साठे, खजिनदार भिकन अंबे, यांनी त्यांचे अभिनंदन केले.





