World Team Table Tennis Championships 2024 :- जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय महिला संघाची वाटचाल यशस्वीरीत्या सुरु आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात भारताच्या महिला संघाने उझबेकीस्तानचा ३-० असा पराभव केला. या विजयात पुन्हा एकदा स्टार खेळाडू मनिका बात्रा चमकली. भारताच्या पुरुष संघाला मात्र, यजमान दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला.
सोमवारी झालेल्या लढतींसाठी अह्यीका मुखर्जी व श्रीजा अकुला यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यांच्या जागी अर्चना कामथ व दिया चितळे यांनी संधी दिली गेली व त्यांनी या संघाचे सोने केले. अर्चनाने रिम्मा गुफार्नोव्हचा ११-७, ११-३, ११-६ असा पराभव केला. दियाने रोझलिना खात्जीव्हाचा ११-६, १०-१२, ११-४, ११-६ असा पराभव केला.
स्टार खेळाडू मनिकानेही वर्चस्व कायम राखताना मार्खाबो मेग्देइव्हावर ११-७, ११-४, ११-१ अशी मात केली. या स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत चीनकडून ३-२ असा पराभव स्वीकारल्यानंतर भारताच्या महिला संघाने थाटात पुनरागमन केले. चीनविरुद्धच्या पराभवानंतर भारताने हंगेरीवर मात केली व उझबेकीस्तानचाही धुव्वा उडवताना विजेतेपदाची आशा कायम राखली आहे. आता त्यांचा पुढील सामना स्पेनशी होणार आहे.
#FIHProLeague24 (Women’s) : रोमहर्षक सामन्यात भारताची यूएसवर मात, शूटआउटमध्ये ठरला विजेता…
या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला मात्र, पराभवाचा सामना करावा लागला. मानांकित खेळाडू अचंथा कमलला दक्षिण कोरियाच्या ली सॅम सुइकडून ९-११, ८-११, ६-११, ५-११ अशी हार सहन करावी लागली. हरमीत देसाइचा जॅंग वोजीनने ४-११, १०-१२, ८-११ असा पराभव केला. तर, अखेरच्या लढतीत जी. साथियनला लिम जॉंगहुनकडून ५-११, ७-११, ७-११ असा पराभव पत्करावा लागला.
सलामीच्या लढतीत भारतीय संघाने चिलीचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांना पोलंडकडून तर आता यजमान दक्षिण कोरियाकडून पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपूष्टात आले आहे.