हेलिकॉप्टर उत्पादनात महाराष्ट्राची झेप ! नागपूरमध्ये 8 हजार कोटींचा प्रकल्प, 2000 रोजगार संधी

मुंबई : नागपूर येथे सुमारे 8 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन आणि मॅक्स एअरोस्पेस अँड एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात नागपूरमध्ये हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हेलिकॉप्टर उत्पादनासाठी मॅक्स एअरोस्पेसने महाराष्ट्र, विशेषतः नागपूरची निवड केल्याचा आनंद आहे. मॅक्स एअरोस्पेसच्या व्यवसायाच्या प्रवासात राज्य शासनही सहभागी आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी नागपूरमध्ये चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत.
मॅक्स एअरोस्पेसला त्यांच्या उत्पादन कारखान्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल. कंपनीने आपले उत्पादनाचे काम ठरलेल्या वेळेत सुरू करावे. या प्रकल्पामुळे नागपूरमधील संरक्षण उत्पादन क्षेत्राला गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
हा करार भारताच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला चालना देणारा आहे. हेलिकॉप्टरचे कस्टमायझेशन आणि पूर्ण उत्पादन यासाठी समर्पित असलेला महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असेल. या उपक्रमामुळे महाराष्ट्र हे एअरोस्पेस उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येणार आहे.
या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा समावेश असून, रोटरी-विंग प्लॅटफॉर्म्सचे कस्टमायझेशन, इंटिग्रेशन आणि फ्लाइट टेस्टिंग यासाठी हे ‘उत्कृष्टता केंद्र’ (सेंटर ऑफ एक्सलन्स) म्हणून कार्य करणार आहे.
नागपूर विमानतळाजवळ हे केंद्र असल्यामुळे विद्यमान पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक सपोर्टचा लाभ घेता येईल आणि भारताच्या एरोस्पेस पुरवठा साखळीत महाराष्ट्राचे स्थान बळकट होईल. यावेळी मॅक्स एअरोस्पेसचे अध्यक्ष भरत मलकानी, संबंधित विभागाचे सचिव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सामंजस्य कराराचा तपशील:
प्रकल्पाचे नाव : हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना
ठिकाण : नागपूर
गुंतवणूक : सुमारे ₹8000 कोटी
रोजगार संधी : 2000
प्रस्तावित प्रारंभ वर्ष : 2026





