Sunetra Pawar : दिल्लीकडे महाराष्ट्राचं लक्ष; NCP मध्ये सत्तासंघर्ष? सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल, नेमकं काय घडतयं?
Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार एकट्याच दिल्ली दौऱ्यावर आल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. त्या भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची दाट शक्यता आहे.

Sunetra Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. पक्षात अंतर्गत संघर्ष निर्माण झाल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. पक्षातील घटनेत बदल केल्याप्रकरणी विविध चर्चा सुरू झाल्या असून, उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार नाराज असल्याची देखील चर्चा रंगली आहे.
या चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवार काल अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत पक्षातील कोणताही ज्येष्ठ नेता नाही. त्या एकट्याच दिल्ली दौऱ्यावर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज दिल्लीमध्ये सुनेत्रा पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाच्या प्रमुख नेत्यांना भेटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज महाराष्ट्राचे लक्ष दिल्लीकडे असणार आहे.
पत्रामुळे संघर्षाची चर्चा
उपमुख्यमंत्री झाल्यानंतरचा सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलही नाहीत आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही नाहीत. पक्षाच्या घटनेत बदल करून अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षांकडे अधिकार द्यावेत याबाबतचे पत्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानंतर पक्षात अंतर्गत सुप्त संघर्ष निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आज सुनेत्रा पवार भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीदरम्यान काय बोलणार आणि कोणती भूमिका घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
दोन महत्वाच्या नेत्यांच्या पदांचा उल्लेख नाही
सुनेत्रा पवार यांनी 10 मार्च 2026 रोजी निवडणूक आयोग (Election Commission of India) यांना एक अधिकृत पत्र पाठवले होते. या पत्राबद्दल मोठी चर्चा होत आहे. त्यांनी स्वतःचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून केला. तसेच पक्षाच्या सुमारे 14 पदाधिकाऱ्यांची यादी आयोगाला दिली. मात्र त्या यादीत फक्त दोन पदांचा स्पष्ट उल्लेख होता. सुनेत्रा पवार – राष्ट्रीय अध्यक्ष आणि शिवाजीराव गर्जे – खजिनदार. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावांसमोर कोणतेही पद नमूद केले नव्हते. यानंतर पक्षात फेरबदल किंवा मतभेद आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, सोमवारी वांद्रे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्वाचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांच्यात बैठक झाली. या बैठकीत घटनेत केलेल्या बदलाबाबत स्पष्टीकरण सुनेत्रा पवार यांना द्यावं असा निर्णय घेण्यात आला. मात्र, सुनेत्रा पवारांचा अचानक ठरलेल्या या दिल्ली दौऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चर्चांना उधाण आले आहे.





