Kukadi Canal Accident : काळजाचा थरार! ४० तासांनंतर सापडले ‘त्या’ दाम्पत्याचे मृतदेह; चिमुरड्याच्या रडण्याने उघड झाली घटना.
Kukadi Canal Accident : पाण्याचा वेग आणि प्रशासकीय विलंबामुळे शोधकार्यात अडथळे; ग्रामस्थांच्या आग्रहानंतर कालव्याचे पाणी थांबवताच मृतदेह हाती.

Kukadi Canal Accident – येडगाव धरणाच्या कुकडी डाव्या कालव्यात पडून उंब्रज येथील अक्षय यशवंत शिंगोटे (वय 28) व प्राजक्ता अक्षय शिंगोटे (वय 25) या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी (दि. 30) सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर तब्बल 40 तासांच्या शोधमोहिमेनंतर बुधवारी (दि. 1) सकाळी लेंडेस्थळ येथे दोघांचेही मृतदेह आढळून आले. सोमवारी सायंकाळी काही नागरिक काळवाडीच्या दिशेने कालव्यालगतच्या रस्त्याने जात असताना कालव्याच्या कडेला एक लहान बालक रडत आई-वडिलांना हाका मारताना दिसले.
संशय आल्याने नागरिकांनी परिसराची पाहणी केली असता चप्पल आढळून आली. कालव्यात लक्ष दिल्यावर संबंधित दाम्पत्य पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विश्वास जाधव व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूरपर्यंत शोध घेण्यात आला, मात्र पाण्याचा प्रचंड वेग असल्याने शोधकार्याला अडथळे आले. दरम्यान, उंब्रज व काळवाडी येथील ग्रामस्थ, सरपंच हिरामण हांडे, तुषार वामन तसेच पोलीस पाटील राहुल हांडे यांनी पाटबंधारे विभागाकडे कालव्याचे पाणी कमी करण्याची मागणी केली.
सुरुवातीला अधिकार्यांनी असमर्थता दर्शविल्याने ग्रामस्थ व अधिकार्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. अखेर ग्रामस्थांच्या आग्रहानंतर बुधवारी सकाळी कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. यानंतर जुन्नर येथील शिवनेरी रेस्क्यू टीमच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. घटनास्थळापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर लेंडेस्थळ येथे दोघांचे मृतदेह सापडले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक विश्वास जाधव, आळेफाटा पोलीस ठाण्याचे कर्मचारी व पोलीस पाटील राहुल हांडे यांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.





