Weather Alert : महाराष्ट्रात वारं बदललं, सोमवारी वादळी पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Weather Alert : महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर आता पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.

Weather Alert : राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून ढगाळ हवामानाची स्थिती कायम आहे. आता वातावरणात बदल होत असून पावसाला पोषक परिस्थिती तयार झाली आहे.
किमान तापमानात हळूहळू वाढ होताना दिसत असून, थंडीचा प्रभावही कमी होत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवार (२ फेब्रुवारी) रोजी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणात हवामान बदलणार
कोकण किनारपट्टीवर हवामानात लक्षणीय बदल जाणवण्याची शक्यता आहे. मुंबईत सकाळच्या वेळेत धुक्याचे वातावरण राहील, तर नंतर आकाश अंशतः स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे.
मुंबईत कमाल तापमान सुमारे ३१ अंश, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कोरडे हवामान
पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पुणे शहरात सकाळी थंडावा जाणवेल, तर दिवसभर आकाश मुख्यतः स्वच्छ राहील. पुण्यात कमाल तापमान ३० अंश, तर किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात तुरळक पावसाचा अंदाज
मराठवाडा विभागातील काही भागांत हवामान बदलण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येथे कमाल तापमान ३१ अंश, तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहू शकते.
उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट
उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता अधिक असून, जळगाव, नाशिक, धुळे आणि घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासोबत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच अहिल्यानगर आणि नंदुरबार जिल्ह्यांतही हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान ३१ अंश, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
विदर्भात थंडीचा प्रभाव कमी
विदर्भात थंडीचा जोर ओसरला असून, नागपूर आणि परिसरात अंशतः ढगाळ हवामान राहील. सकाळी हलका गारवा जाणवेल, तर दुपारनंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान ३१ अंश, तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
राज्यातील हवामानात अचानक बदल होत असल्याने सर्दी-खोकला, ताप यांसारख्या आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.





