महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: नोव्हेंबर महिन्यात ‘हे’ 7 दिवस असणार ड्राय डे !

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात पार पडणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच, राज्यातील नोव्हेंबर महिन्यातील ड्राय डेची संख्या वाढून सात झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यातील पहिला ड्राय डे 1 नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त आहे. यानंतर 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आणि 15 नोव्हेंबरला गुरु नानक जयंतीच्या दिवशी ड्राय डे असणार आहे.
निवडणूक प्रचार संपण्याची तारीख 18 नोव्हेंबर आहे, त्या दिवशी संध्याकाळी 5 वाजल्यानंतर ते 20 नोव्हेंबरला मतदान पूर्ण होईपर्यंत राज्यातील सर्व दारू विक्री करणारी दुकानं बंद राहतील. तसेच 23 नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल जाहीर होत असल्याने तो देखील ड्राय डे असेल.
मतदानाच्या 48 तास आधी ड्राय डे घोषित करण्याचा नियम निवडणूक आयोगाने ठरवला आहे, याचा उद्देश मतदारांना लाच म्हणून दारू वितरण टाळणे आहे. त्यामुळे मतदानाच्या अगोदर आणि निकालाच्या दिवशी राज्यभरात दारूची विक्री थांबवली जाते.
नोव्हेंबर महिन्यातील ड्राय डेचे दिवस:
1 नोव्हेंबर – दिवाळी, 12 नोव्हेंबर – कार्तिकी एकादशी, 15 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती, 18 नोव्हेंबर – प्रचार संपल्यानंतर, 19 नोव्हेंबर – मतदानाच्या आधीचा दिवस, 20 नोव्हेंबर – मतदानाचा दिवस, 23 नोव्हेंबर – निकालाचा दिवस.
निवडणुकीदरम्यान, मतदारांना प्रभावित करण्यासाठी दारूचा वापर होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाची ही महत्त्वाची उपाययोजना आहे.





