VHT 2024-25 : आयपीएल 2025 पूर्वी ऋतुराजचा धावांचा पाऊस, ‘या’ स्पर्धेत 16 चौकार अन् 11 षटकारासह ठोकले वादळी शतक….

Vijay Hazare Trophy 2024-2025 (Ruturaj Gaikwad) :- विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतकांचा पाऊस पडत आहे. 38 संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत चाहत्यांना एकापेक्षा एक अनेक थरारक सामने पाहायला मिळत आहेत.आता महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने सर्व्हिसेसविरुद्ध नाबाद 148 धावा केल्या आहेत. टूर्नामेंट सुरू होऊन फक्त तिसरा दिवस आहे अन् 10 हून अधिक खेळाडूंनी शतके ठोकली आहेत. गायकवाडच्या शतकी खेळीमुळे महाराष्ट्राने एकदिवसीय सामन्यात 21 व्या षटकातच 205 धावांचे लक्ष्य गाठले. विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासातील गायकवाड याचे हे 13वे शतक आहे.
आयपीएल 2025 पूर्वी सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड उत्कृष्ट फॉर्ममध्ये आला आहे. या खेळाडूची जादू विजय हजारे ट्रॉफीमध्ये पाहायला मिळाली. 205 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने शतक झळकावले. गायकवाडने या सामन्यात सुमारे 200 च्या स्ट्राईक रेटने धावा करत विरोधी संघाचा धुव्वा उडवला. गायकवाडने 74 चेंडूत नाबाद 148 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 11 षटकार मारले.
गायकवाडने अवघ्या 57 चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. गायकवाडच्या शानदार खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने अवघ्या 20.2 षटकांत सामना जिंकला. आता महाराष्ट्राचा संघ 2 सामन्यांत दोन विजय मिळवून ब-गटात अव्वल स्थानावर आहे. याआधी महाराष्ट्राने राजस्थानचा 3 गडी राखून पराभव केला होता.
Captain Ruturaj Gaikwad 148*(74) While Chasing Just 205 in a List A Game 🔥 pic.twitter.com/XszEWfIVAK
— Junaid Khan (@JunaidKhanation) December 23, 2024
असा झाला सामना….
प्रथम फलंदाजी करताना सर्व्हिसेसने 48 षटकांत सर्वबाद 204 धावा केल्या होत्या. मोहित अहलावतने संघाकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने 64 चेंडूत 61 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय संघाच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. महाराष्ट्र संघाकडून प्रदीप दधे आणि सत्यजित बच्छाव यांनी सर्वाधिक 3-3 बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना महाराष्ट्राने 20.2 षटकात 1 बाद 205 धावा करत एकतर्फी विजय मिळवला. 205 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना महाराष्ट्राला ऋतुराज गायकवाड आणि ओम भोसले यांनी चांगली सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. भोसले 24 धावा करून बाद झाला, त्यानंतर सिद्धेश वीरने (28 चेंडूत 22 धावा) कर्णधार गायकवाडला (74 चेंडूत 148 धावा) शेवटपर्यंत साथ दिली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके…
आता ऋतुराज गायकवाड विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम करण्यापासून फक्त 2 शतके दूर आहे. आतापर्यंत त्याने या स्पर्धेच्या इतिहासात 13 शतके झळकावली आहेत, या यादीत फक्त अंकित बावणे त्याच्या पुढे आहे, ज्याने त्याच्या कारकिर्दीत विजय हजारे ट्रॉफीमध्ये 14 शतके झळकावली होती. गायकवाड सध्याच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी शतक झळकावणारा पहिला फलंदाज आहे.





