विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्टीबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. तसेच प्रशासकीय कामांना देखील मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. यादरम्यान मुंबईसह राज्य पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिसांच्या सुट्यांबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
काय घेतला निर्णय ?
मुंबईसह राज्य पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिसांच्या साप्ताहिक सुट्टीसह रजा बंद केल्या आहेत. पोलिस महासंचालक कार्यालयाने मंगळवारी एक परिपत्रक जारी करत हे आदेश दिले आहेत. रजा बंदीमधून वैद्यकीय रजा आणि अत्यावश्यक कारणांसाठीच्या रजा वगळण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणूक 2024 चे राज्य पोलिस समन्वय अधिकारी डॉ. छेरिंग दोरजे यांनी संबंधित आदेश जारी केले आहेत.
निवडणूक पार पडेपर्यंत पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक कारणाशिवाय किंवा वैद्यकीय रजा वगळून अन्य कोणत्याही कारणाशिवाय सुट्टी घेता येणार नाही, असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. निवडणुकांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.





