Maharashtra Sahitya Parishad: एक मसाप, दोन अध्यक्ष !
Maharashtra Sahitya Parishad:

महाराष्ट्र साहित्य परिषदेत अविश्वास ठराव बैठकीत गोंधळ
घटनेच्या वैधतेवरून दोन गटांत मतभेद
Maharashtra Sahitya Parishad: महाराष्ट्र साहित्य परिषदेतील (मसाप) अंतर्गत वादाने शुक्रवारी (दि. २८) नवे टोक गाठले. विद्यमान पदाधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी बोलावलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत जोरदार गोंधळ झाला. या बैठकीसाठी प्रथमच पोलीस बंदोबस्त तैनात झाल्याने साहित्यिक वर्तुळातही आश्चर्य व्यक्त होत आहे.
या विशेष बैठकीत अविश्वास ठराव २० विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाल्याचा दावा करीत या गटाने सुनील महाजन यांची अध्यक्षपदी निवड जाहीर केली. तर, बैठक तहकूब झाल्याने पुढील कार्यवाहीच बेकायदेशीर असल्याची भूमिका विद्यमान अध्यक्ष योगेश सोमण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली, त्यामुळे मसाप मध्ये आता दोन अध्यक्षांचे दावे समोर आले आहेत.
साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीतील २१ सदस्यांनी २७ ऑक्टोबरला अध्यक्षांसह प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल होता. ठराव मांडणाऱ्या गटाच्या म्हणण्यानुसार, विद्यमान पदाधिकाऱ्यांनी पीठासीन पद सोडण्यास नकार दिल्याने सभागृहाने डॉ. पुरुषोत्तम काळे यांची पीठासीन अधिकारी म्हणून निवड केली.
त्यानंतर विरोधी गटातील सात सदस्य बाहेर पडले. उर्वरित २० सदस्यांनी हात वर करून ठरावाला समर्थन दिले. त्यामुळे ठराव मंजूर झाल्याचा दावा करत अध्यक्षपदासह प्रमुख कार्यवाहपदी राजन लाखे आणि कोषाध्यक्षपदी उन्मेष गायधनी यांची निवडही जाहीर करण्यात आली.
संमेलनाचा निधी दुष्काळ…
अविश्वास ठराव मंजूर झाल्याचा दावा करणाऱ्या गटाने यापुढील नांदी संमेलने रद्द करून त्यासाठीचा निधी दुष्काळ निवारण निधीकडे वर्ग करण्याचा तसेच शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
सर्व कार्यवाही बेकायदेशीर : सोमण
बैठकीत ठरावावर चर्चा सुरू होण्यापूर्वीच गोंधळ झाल्याने अध्यक्षांनी बैठक अनिश्चित काळासाठी तहकूब केली. त्यानंतर झालेली पीठासीन अधिकाऱ्यांची निवड, अविश्वास ठराव आणि नव्या पदाधिकाऱ्यांची निवड ही सर्व कार्यवाही बेकायदेशीर असल्याचे अध्यक्ष योगेश सोमण गटाने सांगितले. घटनेच्या सद्यस्थितीबाबत धर्मादाय आयुक्तांकडून मार्गदर्शन मागविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाजन गटाने आक्षेप फेटाळला…
मूळ घटनेतील बदल तसेच कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांमधील बदलांचे अहवाल (चेंज रिपोर्ट) धर्मादाय आयुक्तांकडे अद्याप मंजूर झालेले नाहीत. त्यामुळे घटनेच्या आधारे अविश्वास ठरावाची प्रक्रिया राबवता येणार नाही, अशी भूमिका सोमण गटाने मांडली. तर मसापाची नवी घटना २९ डिसेंबर २०२४ पासून लागू झाली असून, १ एप्रिल २०२६ पासून संस्थेचे कामकाज आणि आर्थिक व्यवहार याच घटनेनुसार सुरू आहेत. बदल अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित असला, तरी त्यावर निर्णय होईपर्यंत नव्या घटनेनुसार कामकाज करता येते, असा दावा महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टमधील कलम ५०चा आधार घेत या गटाने केला आहे.





