Vinod Kulkarni : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची कोषाध्यक्ष आणि साताऱ्यात भरलेला 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजन समितीचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला चढवला. एवढंच नाही तर संमेलन घेतोच कसे? अशी धमकी देखील दिली. या हल्ल्यांनंतर कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कुलकर्णी म्हणाले, मी असल्या भ्याड हल्ल्याला भीक घालत नाही. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी माझे विविध मार्गातून प्रयत्न सुरू आहेत. हिंदी भाषा सक्ती आणि साहित्य क्षेत्रामध्ये राजकारणाचा हस्तक्षेप असू नये, अशा दोन मुद्द्यावर माझी संघर्षाची भूमिका आहे. कदाचित या संदर्भाने संमेलन उधळण्याचा काही जणांचा प्रयत्न असावा. मात्र, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने फारसे काही घडले नाही. असे काही घडेल याची कल्पना मला नव्हती. या प्रकरणाच्या तळाशी पोलीस नक्कीच जातील, त्यांच्या तपास यंत्रणेवर माझा विश्वास आहे. मी मराठी भाषेचा सच्चा सेवक आहे. यामध्ये कोणतीही तडजोड नाही. प्रसंगी प्राण गेला तरी बेहत्तर पण मराठी भाषेच्या संदर्भातील साहित्य सेवा मी कधी सोडणार नाही, असं विनोद कुलकर्णी यांनी म्हटले आहे.