Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बीएमसीतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रवी राजा यांनी एक दिवस अगोदर 30 ऑक्टोबर रोजी पक्षाचा राजीनामा दिला होता. दिवाळीच्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रवी राजा यांच्य या पक्षप्रवेशानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. काँग्रेस नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गायकवाड म्हणाल्या की, “रवी राजा यांच्याशी आमच्या कुटुंबाचे चांगले संबंध आहेत. पण इतकी वर्ष काँग्रेसमध्ये राहून ते का गेले माहीत नाही. काँग्रेसने त्यांना सर्व काही दिलं. महापालिकेत विरोधी पक्षनेते पद दिलं त्याबरोबरच इतर महत्वाची पदंसुध्दा दिली. पण तरी देखील ते भाजपमध्ये गेले हे दुर्भाग्यपूर्ण आहे. त्या पुढे म्हणाल्या की, “माझ्या कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करणं चुकीचं आहे. धारावीची जागा ही एससीसाठी आहे, ते धारावीमधून कसे लढले असते? जो योग्य उमेदवार होता. त्याला ही जागा देण्यात आलीये. रवी राजा यांना सायनची जागा हवी होती. ती न मिळाल्याने त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला.” पुढे त्यांनी सांगितल की, रवी राजा यांना कोवीड काळात ज्या नोटीस आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी भीतीपोटी काँग्रेस सोडली आहे. मुंबई काँग्रेसमध्ये योग्य पद्धतीने काम सुरू आहे. काँग्रेस मध्ये कुठलेच अंतर्गत कलह नाहीत. काहीजण नरेटीव्ह पसरविण्याचं काम करत आहेत, असं देखील गायकवाड यावेळी म्हणाल्या. ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने साथ सोडत केला भाजपमध्ये प्रवेश दरम्यान, रवी राजा 44 वर्षे काँग्रेसमध्ये राहिले. यादरम्यान त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. ते बीएमसीचे विरोधी पक्षनेतेही होते. रवी राजा यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पाठवला होता. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका सुरू असताना आणि 20 नोव्हेंबरला मतदान होणार असताना मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रवी राजा यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात लिहिले आहे की,” काँग्रेसने मी केलेल्या 44 वर्षांच्या सेवेचा आदर केला नाही. त्यामुळे मी माझ्या पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. तो मान्य करावा.”