Maharashtra politics : आशिष शेलारांविरोधात प्रिया दत्त? वांद्रे पश्चिममधून काँग्रेसकडून उमेदवार ठरला

Maharashtra politics – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबईच्या वांद्रे पश्चिम विधानसभेसाठी भाजपचे आशीष शेलार प्रतिनिधित्व करत आहेत.
आता या मतदारसंघात अनेक वर्षांपासून राजकारणापासून दूर असलेल्या कॉंग्रेसच्या नेत्या प्रिया दत्त यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानुसार प्रिया दत्त पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्याचे बघायला मिळत आहे.
2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस नेत्या प्रिया दत्त यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर प्रिया दत्त या पक्षाच्या कुठल्याच कार्यक्रमांमध्ये तसेच राजकारणात देखील फारसे सक्रिय दिसल्या नाहीत.
2024 च्या लोकसभेसाठी देखील त्यांच्या नावाची चर्चा झाली होती, मात्र काही कारणास्तव त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. मात्र आता विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू असून उमेदवारी देखील जवळपास निश्चित होण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेस नेत्या प्रिया दत्त यांना उमेदवारी जाहीर झाल्यास वांद्रे पश्चिम येथे भाजप नेते आशिष शेलार व प्रिया दत्त अशी लढत बघायला मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीत प्रिया दत्त यांच्या जागेवर वर्षा गायकवाड यांना संधी देण्यात आली होती व भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांना पराभूत करत त्या खासदार म्हणून निवडणून आल्या. आता विधानसभेसाठी प्रिया दत्त यांना संधी दिली जाऊ शकते.
दरम्यान, वांद्रे पश्चिम जागा प्रिया दत्त यांना सोडली तर वांद्रे पूर्ववर शिवसेना ठाकरे गटाकडून दावा केला जाऊ शकतो. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून झिशान सिद्दीकी विजयी झाले होते. मात्र आता झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. झिशान सिद्दीकी यांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव करत विजय मिळला होता.





