Maharashtra Politics : ‘आघाडीमध्ये मोठी बिघाडी’! ‘या’ जिल्ह्यात 200 निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी दिले तडकाफडकी राजीनामे

नाशिक जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला (विबीए) जबरदस्त धक्का बसला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे आणि निरीक्षक पिंकी दिशा शेख यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी व्यक्त करत तब्बल २०० हून अधिक निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकाचवेळी आपल्या पदांचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या घटनेमुळे पक्षाच्या संघटनात्मक रचनेत अक्षरशः भूकंप झाल्याची परिस्थिती निर्माण झाली असून, नाशिकसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील हे बंड पक्षाच्या भविष्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारे ठरले आहे.
गटबाजी, दुर्लक्ष आणि हुकूमशाहीला कंटाळले कार्यकर्ते
गेल्या काही महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील वंचितच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत होता. संघटनात्मक कामकाजातील अनागोंदी, पक्षातील गटबाजी, निर्णयप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव, स्थानिक पातळीवरील पूर्ण दुर्लक्ष आणि सामान्य कार्यकर्त्यांना दुय्यम लेखण्याची वृत्ती यामुळे नाराजी वाढत होती. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने कार्यकर्त्यांच्या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने अखेर हा रोष उफाळून आला. आज नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सर्व राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पक्षाला “सोडचिठ्ठी” दिली.
यामध्ये माजी स्थायी समिती सभापती आणि ज्येष्ठ नेते संजय साबळे, उत्तर महाराष्ट्र सचिव संजय दोंदे पक्षाचे माजी महासचिव जितेश शार्दूल, भारिप बहुजन महासंघाचे महानगरप्रमुख अनिल आठवले, माजी युवक जिल्हाध्यक्ष मारुती घोडेराव, सिडको विभाग प्रमुख विवेक तांबे, शहर महासचिव संदीप काकळीज सचिव किशोर महिरे आदींचा समावेश असून, त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्तेही राजीनामा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. या सर्वांनी एकमुखाने सांगितले की, “पक्षाच्या नावाखाली काही निवडक मंडळींनी व्यक्तिगत स्वार्थासाठी संघटनेचा वापर सुरू केला आहे. सामान्य कार्यकर्त्यांना धमकी देऊन दडपले जाते. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीशी निष्ठावान आहोत, पण अशा अन्यायकारक आणि हुकूमशाही वातावरणात काम करणे शक्य नाही.”
निवडणुकांपूर्वी संघटनात्मक सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह
महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर असताना झालेल्या या मोठ्या बंडामुळे वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक सामर्थ्यावर गंभीर संकट निर्माण झाले आहे. नाशिक हा पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता, पण एकाचवेळी २०० हून अधिक जागरूक आणि सक्रिय पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा गमावणे हे पक्षासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. विशेष म्हणजे, राजीनामा देणाऱ्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही वंचितांच्या हक्कांसाठी लढत राहू, पण स्थानिक नेतृत्वाच्या अन्यायकारक आणि हुकूमशाही वृत्तीखाली नव्हे.”
नेतृत्वावर दबाव वाढला
नाशिकमधील या घडामोडींमुळे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य नेतृत्वावर प्रचंड दबाव वाढला आहे. पक्षाचे संस्थापक प्रकाश आंबेडकर आणि इतर वरिष्ठ नेते या बंडाला कशी हाताळतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत राजीनामा देणाऱ्यांची ही लाट राज्याच्या इतर भागांतही पसरू शकते, अशी शक्यता राजकीय निरीक्षक वर्तवत आहेत. नाशिकमधील हे संकट पक्षाच्या निवडणूक तयारीला मोठा खीळ घालणारे ठरू शकते.





