Maharashtra Politics : गिरीश महाजन रेव्ह पार्टीचा खरा सूत्रधार? ‘सामना’त आरोपांचा भडीमार

Maharashtra Politics : पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणाने नवे वादळ निर्माण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना या प्रकरणात अटक झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. असं असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.“भाजप हीच एक रेव्ह पार्टी आहे आणि या रेव्ह पार्टीचे सूत्रधार गिरीश महाजन आहेत,” असा थेट हल्लाबोल करण्यात आला आहे.
सामनाचे गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप
‘सामना’च्या अग्रलेखात गिरीश महाजन यांच्यावर खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, “हाताशी पोलीस आहेत म्हणून महाजनसारख्यांचे राजकारण टिकले आहे. खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झाली, त्याच पद्धतीने नवाब मलिक यांचे जावई समीर खान आणि शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान यांनाही खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले होते. हे सर्व बनावट प्रकरण होते.”
अग्रलेखात पुढे असा दावा केला आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांना नैतिकतेचे वावडे आहे. “खडसेंना भोसरी जमीन प्रकरणात अडकवून मंत्रिपदावरून हटवले गेले, पण सध्याच्या मंत्रिमंडळातील नेत्यांमध्ये कोणती नैतिकता आहे? भाजपमध्ये भ्रष्ट आणि अनैतिक लोकांचा भरणा झाला आहे,” अशी टीका करण्यात आली आहे.
‘सामना’ने गिरीश महाजन यांना “सत्तेचे, पैशांचे आणि अनैतिकतेचे बेफाम वारे डोक्यात शिरलेला माणूस” असे संबोधत, त्यांच्यामुळे फडणवीस अडचणीत येऊ शकतात, असा इशारा दिला आहे. “पोलिसांचा मस्तवाल वापर करून महाजन राजकारण करतात. त्यांच्या कारनाम्यांबद्दल फडणवीस यांना माहिती आहे, पण त्यांना अशा लोकांची गरज आहे,” असा आरोपही अग्रलेखात आहे.
खडसे-महाजन यांचा नेमका वाद काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वैर जळगावच्या राजकारणापासून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर चर्चेचा विषय आहे. खडसे यांनी महाजन यांच्यावर हनीट्रॅप आणि अन्य गंभीर आरोप केले होते, तर या रेव्ह पार्टी प्रकरणाने खडसेंच्या कुटुंबाला अडचणीत आणले आहे. खडसे यांनी या अटकेचा सावध प्रतिसाद देत, “ही साजिश असू शकते. अनेक मंत्री अशा प्रकरणात अडकले आहेत, पण त्यांना वाचवण्यासाठी हे सर्व केले गेले असावे,” असे म्हटले आहे.
महाजन यांनी यावर पलटवार करत, “खडसेंना साजिशाची कल्पना होती, तर त्यांनी आपल्या जावयाला सावध का केले नाही? प्रांजल खेवलकर लहान मूल नाही की त्याला कोणी उचलून पार्टीत नेले. त्यांनीच ही पार्टी आयोजित केली होती,” असा टोला लगावला.




