मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्याविरोधात पक्षातील दोन आमदारांनी दिल्ली हायकमांडकडे तक्रार केली आहे. काँग्रेस महाविकास आघाडीसोबत एकत्र निवडणूक लढवणार की स्वबळावर उतरणार, याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित असताना ही गटबाजी पक्षासाठी डोकेदुखी ठरत आहे. काँग्रेसच्या जनसभेत गटबाजीचे दर्शन मुंबईत काँग्रेसतर्फे नुकतीच जनसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत खासदार इमरान प्रतापगढी यांनी कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. सभेला आमदार असलम शेख आणि अमीन पटेल उपस्थित होते. मात्र, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप आणि नसीम खान यांनी या सभेकडे पाठ फिरवली. दोघेही वर्षा गायकवाड यांच्या कार्यशैलीविरोधात असल्याचे वारंवार समोर येत आहे. सूत्रांनुसार, भाई जगताप आणि नसीम खान दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चेसाठी गेले असून, वर्षा गायकवाड यांच्याकडून पक्षात डावलले जात असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. स्वबळावर लढण्याची तयारी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या काही नेत्यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आमदार असलम शेख आणि अमीन पटेल यांनी पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, अशी भूमिका मांडली आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय दिल्ली हायकमांड घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वीही काँग्रेसच्या हायकमांडने दिल्लीत दोन बैठका घेऊन नेत्यांच्या भूमिका जाणून घेतल्या आहेत. आता वर्षा गायकवाड यांच्याविरोधातील तक्रारींमुळे पक्षश्रेष्ठी काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षातील अंतर्गत कलह चिंतेचा विषय मुंबई काँग्रेसमधील गटबाजी ही नवीन बाब नाही. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर वर्षा गायकवाड यांच्याविरोधातील नाराजी उघड झाल्याने पक्षाची एकजूट धोक्यात येण्याची भीती आहे. भाई जगताप आणि नसीम खान यांच्या अनुपस्थितीमुळे आणि त्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम मुंबई महापालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या रणनीतीवर होऊ शकतो. हायकमांड या गटबाजीला आळा घालून पक्षाला एकसंघ ठेवण्यात यशस्वी होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.