Maharashtra Politics : मतदार याद्यांमध्ये घोळ ! महाविकास आघाडीचा भाजपवर गंभीर आरोप

Maharashtra Politics – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमध्ये घोळ निर्माण करण्याचे काम भाजपकडून सुरु आहे, असा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला आहे. निवडणूक आयोगाच्या कामात पारदर्शकता नाही. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
देशातील निवडणुका निष्पक्षपणे घेण्याच्या अधिकारांचे राज्यात उल्लंघन सुरु आहे. निवडणुकीत आपण विजय होऊ शकत नाही, पराभवाला घाबरून या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी लोकशाहीविरोधात मोठ कारस्थान सुरु केले आहे. याचीच तक्रार घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला भेट दिली.
काही मतदारसंघ त्यांनी ठरवले आहेत, जवळपास 150 मतदारसंघ आहेत. त्यासाठी विशिष्ट अॅपची निर्मिती करून आमचे (महाविकास आघाडी) किमान 10 हजार मतं यादीतून काढायची आणि त्याजागी बाहेरील बोगस मतदारांची नावे त्यात टाकायची, असे षडयंत्र भाजपकडून सुरु आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
प्रत्येक मतदारसंघात भाजपच्या टीम काम करत आहेत. या सर्वाचे सूत्रधार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत. हा तांत्रिक मुद्दा असला तरी महाराष्ट्राच्या भविष्याचा मुद्दा आहे. हे षडयंत्र आम्ही उघड पाडूच शिवाय लोकांमध्ये जागृती निर्माण करु. वेळ पडली तर महाराष्ट्रीतील मतदारांचा विराट मोर्चा निवडणूक आयोगावर काढावा लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.





