Maharashtra Politics : महायुतीत मिठाचा खडा पडला! ‘या’ आमदाराने दिला ‘स्वबळाचा’ नारा

जळगाव : येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका पार पडणार आहेत. हि लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहेत. यादरम्यान जळगावच्या पाचोरा, भडगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार किशोर पाटील यांनी जाहीरपणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. त्यामुळे पाचोरा, भडगाव मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
किशोर पाटील यांचा भाजपवर आरोप
आमदार किशोर पाटील यांनी यावेळी भाजपवर थेट आरोप करत म्हटले की, “दोन टर्मपासून विरोधक गुपचूप किंवा थेट उमेदवार देत मला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जनता आणि शिवसैनिक माझ्या पाठीशी आहेत.भाजपाच्या काही नेत्यांनी पाठीत खंजीर खूप असणार असाल तर, “अशा लोकांसोबत राहण्यापेक्षा समोरासमोर लढणं कधीही बरे. त्यामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघात युती होणार नाही आणि शिवसेना एकहाती निवडणूक लढेल,असे किशोर पाटील यांनी जाहिर केले आहे.
निर्धार मेळाव्याचे आयोजन
1 नोव्हेंबर रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा या ठिकाणी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला सर्व शिवसैनिकांनी, बंधू – भगिनींनी, शेतकरी बांधवानी उपस्थित राहून शुभ आर्शिर्वाद द्यावेत असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले आहे.
भाजपकडून देखील प्रत्युत्तर
किशोर पाटील यांनी पाचोरा भडगाव मतदार संघात कोणाशीही युती न करण्याची भूमिका घेतल्याने चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनीही लगेच आढावा बैठक घेत त्यांची भूमिका जाहीर केली.भाजपलाही स्वबळावर लढावे लागेल असे मंगेश चव्हाण म्हणाले.





