Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम; शिंदेच्या ‘या’ आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

बुलढाणा : महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम खाते जगात कुठेही नाही. छाप्यात ५० लाख पकडले तर ते ५० हजारच दाखवतात, असे वादग्रस्त वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले माझ्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना संजय गायकवाड नावाच्या पहाडाला पार करावा लागेल. पोलीस काहीही करू शकत नाहीत. माझ्या घरासमोर माझी गाडी जळाली कुठेही तपास झाला नाही. त्यामुळे पोलीस हे अकार्यक्षम असून बुलडाण्यातील २ पोलीस हे चोरांचे सरदार आहेत.
चोरीचा माल पोलिसांच्या घरात आढळतोच कसा? असा सवाल करत त्यांनी पोलिसांवर संशय व्यक्त केला. तर याचवेळी त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत वादग्रस्त वक्तव्य केले. शासनाने कोणताही नवा कायदा केला की, यांचा एक हप्ता वाढतो. गुटखा बंदी केली तर गुटखा विकायचा आणि हप्ता वाढवायचा, दारू बंदीच्या बाबतीतही तसेच करायचे एक हप्ता वाढलाच. पोलिसांनी इमानदारीने काम केले तर जगातील सगळी गंदगी खतम होईल. फक्त त्यांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य केले पाहिजे, असे ते म्हणाले.





