सस्पेन्स कायम ! १ -४, २-२-१ की अडीच अडीच वर्षे ? ; मुख्यमंत्रीपदासाठी नवनवीन फॉर्म्युले तयार मात्र निर्णय लांबणीवरच

Maharashtra New CM । राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवून महायुतीने राज्यातील सत्तेच्या चाव्या आपलीकडेच ठेवल्या आहेत. मात्र सत्ता जरी महायुतीकडे आली असली तरी बहुमताच्या सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त म्हणजेच 132 जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे, असा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे . तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत ही त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आता हा सगळा गोंधळ सुरु असताना मुख्यमंत्रीपदासाठी नवनवीन फॉर्म्युले समोर येत आहेत.
1-4 चा फॉर्म्युला ठरवला जाऊ शकतो Maharashtra New CM ।
मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीकडून समोर आलेल्या फॉर्म्युलानुसार 1-4 चा फॉर्म्युला ठरवला जाऊ शकतो. त्यामुळे या फॉर्म्युलानुसार एकनाथ शिंदे यांना पुढील एक वर्षासाठी मुख्यमंत्रीपद देण्यात येऊ शकते.तर पुढची चार वर्ष मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात टाकली जाऊ शकते. कारण सध्या राज्यातील वातावरण हे देवेंद्र फडणवीस हे मराठाविरोधी असल्याचे निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या काळात याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसू शकतो असे म्हटले जात आहे.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला राज्यात मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. या निवडणुकी संपेपर्यंत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी ठेवले जाऊ शकते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची सुत्रे दिली जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.
तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे 2016 साली मुख्यमंत्री असताना भाजपने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उत्तम कामगिरी केली होती. त्यामुळे आतादेखील फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करेल. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी राहून त्यामध्ये योगदान देऊ शकतात, असाही एक मतप्रवाह आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते, यासाठी आणखी एका नव्या फॉर्म्युलाचीही जोरदार चर्चा आहे. त्यानुसार आधी दोन वर्षे देवेंद्र फडणवीस यांना, त्यानंतर दोन वर्षे एकनाथ शिंदे यांना आणि त्यानंतर एक वर्षे अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळेल, अशीही चर्चा आहे. तसेच फडणवीस आणि शिंदे यांच्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची वाटणी होईल, अशाही फॉर्म्युलाची चर्चा सुरु आहे.
शिंदे गटाला मुख्यमंत्रीपदा ऐवजी केंद्रात महत्त्वाचे खाते?
एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेतल्यास भाजपकडून त्याची भरपाई केली जाऊ शकते. त्यानुसार शिंदे यांच्या पक्षाला केंद्रात महत्त्वाचे खाते मिळू शकते. तर श्रीकांत शिंदे यांचा राज्यातील मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेताना भाजपचे नेते त्यांची कशाप्रकारे मनधरणी करणार, हे पाहावे लागेल. शिंदे यांची समजूत काढण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. त्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी शनिवारी किंवा रविवारी होण्याची शक्यता आहे.





