पुणे: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा ‘सफाया’ करण्याचा स्पष्ट संदेश दिला. राज्यात सध्या ‘डबल इंजिन’ सरकार असूनही आपण समाधानी नसल्याचे सांगत, महाराष्ट्रात जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगरपरिषदांमध्येही भाजपचेच वर्चस्व असावे आणि राज्याला ‘ट्रिपल इंजिन’ सरकार मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विरोधक ‘दुर्बिणीनेही दिसणार नाहीत’ इतकी ताकद वापरून निवडणूक लढवण्याचे आवाहन शहा यांनी केले. मुंबईत महाराष्ट्र भाजपच्या (Maharashtra BJP) नव्या प्रदेश मुख्यालयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमातून ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यसंस्कृतीवर आणि पक्षातील लोकशाही मूल्यांवर जोर दिला, तसेच उद्धव ठाकरे आणि घराणेशाहीवर नाव न घेता निशाणा साधला. पक्ष कार्यालय हे ‘मंदिर’, केवळ ऑफिस नव्हे – भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अमित शहा यांनी पक्षाच्या कार्यालयाचे महत्त्व विशद केले. “इतर पक्षांसाठी कार्यालय हे केवळ ऑफिस असू शकते, पण भाजपसाठी ते मंदिरासारखे आहे,” असे शहा म्हणाले. ते म्हणाले, “कार्यालयातच आमचे काम होते, पक्षाचे सिद्धांत संवर्धित व संरक्षित होतात आणि कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होते. महाराष्ट्र भाजप नव्या इमारतीचे भूमिपूजन करून इतिहासात एक नवी सुरुवात करत आहे.” भाजप घराणेशाही नव्हे, लोकशाही मूल्यांवर चालणारा पक्ष- भाजप हा घराणेशाहीवर नव्हे, तर लोकशाही मूल्यांवर चालणारा पक्ष असल्याचे स्पष्ट करताना शहा यांनी स्वतःचे उदाहरण दिले. “मी १९८१ मध्ये बूथ अध्यक्ष म्हणून भाजपमध्ये काम सुरू केले आणि पुढे पक्षाचा अध्यक्ष झालो. जो कार्यकर्ता लोकशाही व पक्षाच्या सिद्धांतावर मार्गक्रमण करतो आणि कार्यक्षमता सिद्ध करतो, तोच या पक्षात मोठा नेता होऊ शकतो.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदाहरण देत ते म्हणाले, “एका गरीब चहावाल्याच्या घरी जन्मलेला व्यक्ती आपल्या त्याग, समर्पण आणि देशभक्तीच्या आधारावर या देशाचा तीनवेळा पंतप्रधान झाला. ज्या पक्षांमध्ये अंतर्गत लोकशाही नसते, ते देशाच्या लोकशाहीचे संरक्षण करू शकत नाहीत.” ‘ट्रिपल इंजिन’साठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे निर्देश- राज्यात सध्या भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे ‘डबल इंजिन’ सरकार सत्तेत आहे. याबद्दल बोलताना शहा म्हणाले, “सध्या महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार आहे. त्याचे तुम्हाला समाधान असेल, पण मला नाही. मला डबल इंजिन नव्हे, तर ट्रिपल इंजिन सरकार हवे आहे.” त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट निर्देश दिले. जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत आणि नगर परिषदांमध्येही भाजपचेच प्रशासन असले पाहिजे. “पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवून विरोधकांचा सफाया करावा. दुर्बिणीनेही ते दिसणार नाहीत एवढ्या ताकदीने आपल्याला ही निवडणूक लढायची व जिंकायची आहे,” असे आक्रमक आवाहन शहा यांनी केले. उद्धव ठाकरेंवरही टीकास्त्र- यावेळी अमित शहा यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर नाव न घेता टीका केली. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा संदर्भ देत ते म्हणाले, “मी सन्मानपूर्वक तडजोडीचा प्रस्ताव ठेवला. पण तो पुढे सरकला नाही. त्यामुळे आम्ही दीर्घकाळानंतर पहिल्यांदाच स्वबळावर निवडणूक लढलो आणि महाराष्ट्राला प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री मिळाला. त्यानंतर सलग तीनवेळा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आमचे सरकार आले. आज ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आमच्यासोबत आहेत.”