Weather Update : महाराष्ट्रात किती पाऊस पडणार? ‘एल नीनो’ मुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले
Weather Update : IMD ने २०२६ च्या मान्सूनसाठी ९२ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जूननंतर एल नीनो सक्रिय होणार असल्याने महाराष्ट्रात पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे.

Weather Update : यंदाच्या मान्सूनबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा अंदाज समोर आला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, 2026 मध्ये देशात सरासरीच्या सुमारे 92 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा आकडा सामान्यपेक्षा कमी पावसाचा संकेत मानला जातो. (Weather Update)
हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा मान्सूनवर एल नीनो चा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून या कालावधीत परिस्थिती तटस्थ राहण्याचा अंदाज असला तरी, जूननंतर एल नीनो सक्रिय होऊ शकतो. त्यामुळे मान्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून देशात उष्णतेची लाट अधिक तीव्र होऊ शकते.
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास, राज्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून शेतकरी चिंतेत आहेत. (Weather Update)
दरम्यान, ईशान्य भारत, उत्तर-पश्चिम भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भागांमध्ये मात्र यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याने मान्सून वेळेवर देशात दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील काळात एल नीनोचा प्रभाव वाढल्यास पावसाचा जोर कमी होऊ शकतो, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. (Weather Update)





