नवी दिल्ली – देशाला राजकीय परिवर्तन हवे आहे. त्यासाठी महाराष्ट्राने मार्ग दाखवला. लोकसभा निवडणुकीतून महाराष्ट्राने परिवर्तनाविषयी स्पष्ट संदेश दिला, अशी भूमिका कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मांडली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्या रणसंग्रामाची रणनीती ठरवण्यासाठी कॉंग्रेसची दिल्लीत बैठक झाली. त्या बैठकीला पक्षाचे नेते राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी रमेश चेन्निथला आणि राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खर्गे यांनी आगामी निवडणुकीची तयारी सुरू करावी लागणार असल्याचे नमूद केले. कॉंग्रेसने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवली. त्या निवडणुकीतील चांगल्या कामगिरीबद्दल मी कॉंग्रेसच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. तसेच, जनतेचे आभार मानतो, असे ते म्हणाले. कॉंग्रेसने महाराष्ट्राला देशातील सर्वांत विकसित राज्य बनवले. मात्र, भाजप सरकारने उद्योग उद्धवस्त केले. तसेच, जनतेला बेरोजगारी, महागाईच्या दुष्टचक्रात अडकवले. शेतकऱ्यांवर सर्वांधिक अन्याय करण्यात आला, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. महाराष्ट्रातील प्रत्येक भागात कॉंग्रेसची मुळं खोलवर रूजली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला निर्णायक विजय मिळवून देण्यासाठी पक्षाचे नेते एकजुटीने कार्य करतील. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेसने दमदार कामगिरी केली. ती कामगिरी आणखी उंचावून महाराष्ट्रात अवैधरित्या स्थापन झालेले सरकार आम्ही सत्तेवरून घालवू, असा विश्वास कॉंग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी व्यक्त केला. कॉंग्रेसचा समावेश असणाऱ्या महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. त्या आघाडीने महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण ४८ पैकी तब्बल ३० जागा जिंकल्या. कॉंग्रेसने सर्वांधिक १३ जागा जिंकण्याची किमया केली. त्या कामगिरीमुळे उत्साह दुणावलेल्या कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे.