Maharashtra Kesari 2026 wrestling competition inaugurated by Dy CM Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या मातीतील अस्मितेचा खेळ असलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा भव्य शुभारंभ आज (१८ मार्च) ‘स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी’त पार पडला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कुस्तीची प्रतिष्ठा आपण जपली पाहिजे – सुनेत्रा पवार उद्घाटन प्रसंगी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “कुस्तीची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. या कुस्तीतूनच पाहिले ऑलिम्पिक आपल्या देशाला मिळाले. या महाराष्ट्रात अनेक दिग्गज मल्ल या कुस्तीतून घडले आहेत. कुस्तीची प्रतिष्ठा आपण जपली पाहिजे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलेले खेळाडू जागतिक पातळीवर झळकावेत हीच आदरणीय दादांची (अजित पवार) कायम भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळेच महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा प्राप्त झाली. आदरणीय दादांच्या क्रीडा प्रेमाचा आणि तळमळीचा वारसा आपण सगळ्यांनीच पुढे नेऊयात.” खेळाडूंनी आखाड्यामध्ये प्रामाणिकपणा दाखवावा – सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या, “वाघोलीच्या स्पर्धेचे आयोजन खरंतर अत्यंत दिमागदार पद्धतीने करण्यात आलं त्यासाठी या स्पर्धेचे आयोजक रामकृष्ण सातव पाटील आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचा मी विशेष अभिनंदन करते, त्यांचं कौतुक करते. या स्पर्धेचे उद्घाटन करताना खर तर मी एवढेच आवाहन करते की खेळाडूंनी आखाड्यामध्ये प्रामाणिकपणा दाखवा. आपला खेळ अतिशय चांगल्या प्रकारे सादर करा, आपल्या महाराष्ट्रचे नाव जगामध्ये उज्वल करा. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांचं मी मनापासून अभिनंदन करते. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व मल्लांना त्यांच्या प्रशिक्षकांना मनापासून शुभेच्छा देते.” विक्रमी ४००० महिलांचा सहभाग आणि भव्य बक्षिसे – आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांनी सांगितले की, कुस्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी यंदा प्रथमच महिलांचा गौरव करण्यात येत असून, ४००० महिला या सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत. मामासाहेब मोहोळ यांनी सुरू केलेली ही परंपरा यंदा अधिक भव्य स्वरूपात साजरी होत आहे. विजेत्यांसाठी बक्षिसांचा पाऊस: महाराष्ट्र केसरी विजेता: आलिशान फॉर्च्युनर गाडी. उपविजेता: स्कॉर्पिओ गाडी. सुवर्णपदक विजेते: १८ बुलेट गाड्या. रौप्यपदक विजेते: स्प्लेंडर गाड्या. हेही वाचा – IND vs PAK : मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाकिस्तान ‘महायुद्ध’! विश्वचषकाच्या एकाच ग्रुपमध्ये मिळालं स्थान २२ मार्चला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार बक्षीस वितरण – १८ ते २२ मार्च या कालावधीत चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील दिग्गज मल्ल एकमेकांशी भिडणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सोहळा रविवारी पार पडेल, जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येईल. या सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका आणि जिल्हा परिषद सदस्यांनी आयोजनाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.