Maharashtra Kesari 2026 : वाघोलीत ६८वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला दमदार सुरुवात; सेमी फायनलमध्ये ‘या’ मल्लांचा राहिला जलवा
Maharashtra Kesari 2026 : गुरुवारी पार पडलेल्या ५७ आणि ८६ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीच्या लढतींनी कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

Maharashtra Kesari 2026 Semi Final Results : पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे सुरू असलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गुरुवारी पार पडलेल्या ५७ आणि ८६ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीच्या लढतींनी कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या चित्तथरारक लढतींमध्ये पदकाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या काही मल्लांचे आव्हान संपुष्टात आल्याने स्पर्धेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. तर काहींनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
माती विभाग: पुणे आणि कोल्हापूरचा दबदबा Maharashtra Kesari 2026
माती विभागातील ५७ किलो गटात पुणे शहराच्या ओंकार निगडे याने कोल्हापूर शहराच्या सुदर्शन पाटीलचा ७-० असा एकतर्फी पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या लढतीत कोल्हापूर जिल्ह्याच्या मृणाल पाटीलने सोलापूरच्या अजय निंबाळकरवर ५-१ अशी मात केली. ८६ किलो गटात सोलापूर शहराच्या मशीद शेखने आपल्याच जिल्ह्यातील जय जाधवचा १०-० असा धुव्वा उडवला. तर पुणे शहराच्या चंद्रहार नरळे याने साताऱ्याच्या विशाल कोकरेला ४-२ अशा चुरशीच्या लढतीत पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला.
गादी विभाग: अक्षय ढेरेची विजयी घोडदौड Maharashtra Kesari 2026
गादी विभागातील ५७ किलो गटात कोल्हापूर शहराचा राष्ट्रीय मल्ल अक्षय ढेरे याने आपल्या अनुभवाचा वापर करत कल्याणच्या विनायक भोईरचा १३-२ अशा मोठ्या फरकाने पराभव केला. नाशिक जिल्ह्याच्या शुभम आचपाळे यानेही साताऱ्याच्या साहिल गोफणेवर १०-२ अशी मात करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
आता सर्वांचे लक्ष सायंकाळी होणाऱ्या अंतिम लढतींकडे लागले असून, यंदाच्या वजनी गटातील सुवर्णपदकावर कोण नाव कोरणार, याची उत्सुकता वाढली आहे.






