NEET paper leak : “नीट पेपरफुटीचा केंद्रबिंदू महाराष्ट्रच..”; संजय राऊतांच मोठं विधान !
नीट पेपरफुटी रॅकेटचा केंद्रबिंदू म्हणून महाराष्ट्र समोर आला आहे. जर या नेटवर्कची मुळे लातूरपासून पुण्यापर्यंत पसरत असतील, तर यासाठी जबाबदार कोण?

NEET paper leak – नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणाचा केंद्रबिंदू महाराष्ट्र असल्याचे समोर आले आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त केल्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान स्वीकारणार का?, असा सवाल ठाकरेसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, केंद्रीय अन्वेषण विभागाने आतापर्यंत १३ जणांना अटक केली असून, त्यातील बहुतांश जण लातूर, पुणे आणि अहिल्यानगर येथील आहेत.
नीट पेपरफुटी रॅकेटचा केंद्रबिंदू म्हणून महाराष्ट्र समोर आला आहे. जर या नेटवर्कची मुळे लातूरपासून पुण्यापर्यंत पसरत असतील, तर यासाठी जबाबदार कोण, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेच पाहिजे.
या पेपरफुटींमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. पेपरफुटी नेटवर्कशी कथितरित्या संबंधित असलेल्या एका आरोपीच्या अटकेचा संदर्भ देत, या रॅकेटमागे महाराष्ट्रातील काही लागेबांधे असल्याचा दावा त्यांनी केला.
सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे, परंतु राज्याची प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस या घडामोडींपासून अनभिज्ञ का होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हा मुद्दा केवळ मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापुरता मर्यादित नसून, तो सुशासन आणि स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या कार्यपद्धतीशी संबंधित एक गंभीर प्रश्न आहे, असेही राऊत यांनी नमूद केले.
महागाई, इंधन दरवाढ आणि देशातील आर्थिक परिस्थिती यांसारख्या मुद्द्यांवर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोपही राऊत यांनी केंद्र आणि राज्याच्या भाजपप्रणीत सरकारवर केला.






