NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटीचे सर्वात मोठे केंद्र महाराष्ट्र; हायप्रोफाईल पालक रडारवर
सीबीआयच्या तपासात महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये थेट प्रश्नपत्रिकांच्या प्रिंट काढून त्या विकल्याचे ठोस पुरावे हाती आले आहेत.

NEET Paper Leak Case – वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठा खुलासा केला आहे. सीबीआयच्या तपासात महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये थेट प्रश्नपत्रिकांच्या प्रिंट काढून त्या विकल्याचे ठोस पुरावे हाती आले आहेत.
धक्कादायक म्हणजे, या संपूर्ण गैरव्यवहाराचे सर्वात मोठे केंद्र महाराष्ट्र असल्याचे समोर आले असून, पेपर खरेदी करणारे हायप्रोफाईल पालक आता सीबीआयच्या रडारवर आले आहेत. मराठवाड्यातील लातूर आणि अंबाजोगाई परिसरात सीबीआयने तपास अधिक तीव्र केला आहे. (NEET Paper Leak)
लातूरच्या जुना औसा रोड परिसरातील एका ‘बीएएमएस’ डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये सीबीआयचे पथक थेट दाखल झाले असून, संबंधित डॉक्टरांची कागदपत्रे आणि बँक खात्यांची पडताळणी सुरू आहे. यापूर्वी दोन डॉक्टरांची चौकशी झाली होती.
तसेच, अटक केलेले बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांचे नेटवर्क परभणी आणि अंबाजोगाईपर्यंत पसरल्याचे समोर आले आहे. अंबाजोगाई येथून काही संशयित विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी लातूरला आणण्यात आले आहे. (NEET Paper Leak)
मुख्य दलाल आणि सूत्रधारांसोबतच मोठी रक्कम मोजून पेपर खरेदी करणाऱ्या पालकांची यादी सीबीआय तयार करत आहे. प्रकरणातील संशयित आरोपी शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी आणि पुण्याची त्यांची सहकारी मनीषा वाघमारे यांच्या बँक खात्यांमध्ये ज्या पालकांनी पैसे ट्रान्सफर केले होते, त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे.
नातेवाईकांनी हा पेपर आणखी किती विद्यार्थ्यांना विकला, याचा निश्चित आकडा शोधण्यासाठी सीबीआयची तीन विशेष पथके इतर राज्यांमध्येही छापेमारीच्या तयारीत आहेत. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. NEET Paper Leak






