Maharashtra Investment WEF: दावोसमध्ये महाराष्ट्राचा डंका! 30 लाख कोटींचे सामंजस्य करार; 40 लाख रोजगार

Maharashtra Investment WEF: जागतिक अर्थकारणाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या दावोस येथील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये (WEF) महाराष्ट्राने गुंतवणुकीचा विक्रम केला आहे.
राज्याने तब्बल ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) केले असून, आणखी १० लाख कोटींच्या गुंतवणुकीबाबत प्राथमिक चर्चा यशस्वी झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. या गुंतवणुकीतून राज्यात ४० लाख नवीन रोजगार निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोस येथून महाराष्ट्रातील पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी गुंतवणुकीचा तपशील आणि राज्याच्या भविष्यातील विकास आराखड्याची माहिती दिली.
परकीय गुंतवणुकीचा ओघ
यावेळच्या करारांचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल ८३ टक्के गुंतवणूक ही थेट परकीय गुंतवणूक (FDI) आहे. अमेरिका, इंग्लंड, जपान, जर्मनी, फ्रान्स आणि युएईसह एकूण १८ देशांमधील कंपन्यांनी महाराष्ट्रात रस दाखवला आहे.
उर्वरित १६ टक्के गुंतवणूक ही परकीय तंत्रज्ञान भागीदारीतून होणार आहे. “केवळ करारच नाही, तर ते प्रत्यक्षात आणण्यावर आमचा भर असून गेल्या वर्षीच्या करारांपैकी ७५ टक्के करार प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यावर आहेत,” असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
प्रादेशिक समतोल आणि क्षेत्रनिहाय गुंतवणूक
राज्याच्या सर्व भागांत उद्योग पोहोचावेत या दृष्टीने गुंतवणुकीचे वाटप करण्यात आले आहे.
विदर्भ: २,७०,००० कोटी रुपये.
मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर): ५५,००० कोटी रुपये.
कोकण आणि एमएमआर: ३,५०,००० कोटी रुपये.
उत्तर महाराष्ट्र (नाशिक, जळगाव, अहिल्यानगर): ५०,००० कोटी रुपये.
ही गुंतवणूक एआय (AI), डेटा सेंटर्स, ग्रीन स्टील, आरोग्य, अन्न प्रक्रिया आणि लॉजिस्टिक्स अशा आधुनिक क्षेत्रांमध्ये होणार आहे. टाटा, रिलायन्स, अदानी, फॉक्सवेगन आणि कोकाकोला यांसारख्या दिग्गज कंपन्यांनी गुंतवणुकीचे पाऊल उचलले आहे.
मुंबईजवळ ‘इनोव्हेशन सिटी’ आणि ‘सर्क्युलर इकॉनॉमी’
टाटा समूहाच्या सहकार्याने मुंबईनजीक देशातील पहिली ‘इनोव्हेशन सिटी’ उभारली जाणार आहे. यासाठी टाटा समूह १ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक करणार असून ६ ते ८ महिन्यांत याचे नियोजन पूर्ण होईल.
तसेच, मुंबईतील कचरा, पाणी आणि हवेच्या प्रदूषणावर उपाय म्हणून ‘सर्क्युलर इकॉनॉमी’ प्रकल्प राबवला जाईल, जो पुढे राज्याच्या इतर शहरांतही लागू केला जाईल.
जागतिक स्तरावर महाराष्ट्राची प्रशंसा
सौरऊर्जा क्षेत्रातील महाराष्ट्राच्या प्रगतीचे झिम्बांब्वेच्या मंत्र्यांनी कौतुक केले. तसेच, मुख्यमंत्र्यांनी अॅलन टुरिंग इन्स्टिट्यूट आणि अरुप समूहाच्या प्रतिनिधींशी भेट घेऊन शाश्वत वाहतूक व्यवस्था आणि नगरविकासावर चर्चा केली.
रायगड-पेण येथे नवीन ‘ग्रोथ सेंटर’ उभारण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली, ज्यामुळे हे क्षेत्र नवीन बिझनेस हब म्हणून उदयास येईल.





