महाराष्ट्राची यशस्वी घौडदौड कायम! परकीय गुंतवणुकीत केला ‘हा’ विक्रम, मुख्यमंत्र्यांनी दिली आकडेवारी

FDI in Maharashtra | परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सातत्याने आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात मागील 10 वर्षातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक मागील अवघ्या 9 महिन्यात झाली असल्याचे समोर आले आहे. यावरून परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे पहिल्या पसंतीचे राज्य असल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिली आहे.
मागच्या 9 महिन्यात राज्यात 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे. याबाबतची आकडेवारी केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने जारी केलेल्या अहवालात समोर आली. डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल जारी केला. या अहवालात राज्यात मागील काही वर्षात देशातील विविध राज्यांमध्ये झालेल्या परकीय गुंतवणुकीची आकडेवारी दिली आहे. सर्वाधिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की, केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे.
गेल्या 10 वर्षांतील विक्रमी परकीय गुंतवणूक
महाराष्ट्रात आली केवळ 9 महिन्यात !केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे.… pic.twitter.com/wPkpWvY4yU
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 7, 2025
2024-2025 या आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यात आतापर्यंत एकूण 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे. ही गेल्या 10 वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक आहे. असे करताना महायुती सरकारने आपलाच 2016-17 या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे. अर्थात या आर्थिक वर्षातील एक तिमाही आणखी बाकी आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!’ असे म्हणताना त्यांनी महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक हे सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे. गुंतवणुकीच्याबाबतीत प्रथम 5 राज्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक पाठोपाठ गुजरात, दिल्ली आणि तमिळनाडूचा समावेश आहे.





