महाराष्ट्र आता थांबणार नाही! परकीय गुंतवणुकीत राज्य टॉपवर, फडणवीसांनी आकडेवारीच दिली

Foreign Direct Investment in Maharashtra : विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात गेल्यावरून विरोधकांकडून महायुती सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात झालेल्या परकीय गुंतवणुकीची आकडेवारीच दिली आहे. परकीय गुंतवणुकीच्याबाबतीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत खूपच पुढे आहे.
संपूर्ण वर्षभराची सरासरी परकीय गुंतवणूक अवघ्या 6 महिन्यातच झाली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या सहामाहीत राज्यात 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत राज्यात मागील 4 वर्षांपासून झालेल्या परकीय गुंतवणुकीची आकडेवारी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, महाराष्ट्र आता थांबणार नाही! वार्षिक सरासरीच्या 95 टक्के, एफडीआय अवघ्या 6 महिन्यात…आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे. आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे.
महाराष्ट्र आता थांबणार नाही!
वार्षिक सरासरीच्या 95 टक्के
एफडीआय अवघ्या 6 महिन्यात…पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की, आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे.
आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्या तिमाहीची आकडेवारी आली… pic.twitter.com/D90Q6Ipq9W— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 3, 2025
गेल्या 4 वर्षांतील सरासरी पाहिली तर 1,19,556 कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 94.71 टक्के गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आली आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
त्यांनी मागील 4 वर्षात राज्यात झालेल्या परकीय गुंतवणुकीचीही माहिती दिली. महाराष्ट्रात 2020-21 मध्ये 1,19,734 कोटी रुपये, 2021-22 मध्ये 1,14,964 कोटी रुपये, 2022-23 मध्ये 1,18,422 कोटी आणि 2023-24 मध्ये 1,25,101 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली. ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2024 पर्यंत राज्यात तब्बल 31 टक्के परकीय गुंतवणूक झाली. महाराष्ट्र खालोखाल परकीय गुंतवणुकीत कर्नाटक आणि गुजरातचा क्रमांक आहे.





