Maharashtra IAS Transfer : महाराष्ट्र शासनाने राज्यातील दोन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली वेगाने सुरू असून, नव्या नियुक्त्यांमुळे संबंधित विभागांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्य शासनाने शुक्रवारी जारी केलेल्या आदेशानुसार राजेश नार्वेकर (IAS:SCS:2009) यांची परिवहन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर समीर कुर्तकोटी (IAS:SCS:2013) यांची मुंबई येथील शुल्क नियामक (Fee Regulatory Authority) प्राधिकरणाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. हे आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. कोण आहेत राजेश नार्वेकर? राजेश नार्वेकर यांनी ठाणे जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून काम पाहिले आहे. मार्च २०२४ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदावरून त्यांची सहकार आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये मुंबईत माहिती तंत्रज्ञान संचालक म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. पुढे त्यांची अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. या पदावर कार्यरत असताना त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे कामकाज पाहिले. आता त्यांच्याकडे परिवहन आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोण आहेत समीर कुर्तकोटी? समीर कुर्तकोटी यांची फेब्रुवारी २०२५ मध्ये राज्य कर (State Tax) सहआयुक्त पदावरून पुणे येथील TRTI (आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था) येथे बदली करण्यात आली होती. ते आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी बुलढाणा आणि भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. बुलढाण्यात कार्यरत असताना ग्रामीण विकास आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. आता त्यांची मुंबईतील शुल्क नियामक प्राधिकरणाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, नव्या जबाबदारीत ते शिक्षण शुल्क नियमनासंबंधी कामकाज पाहणार आहेत.