PMC News : अधिकाऱ्यांमध्येच दिसेना स्पार्क! महापालिका आयुक्तांकडून प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचे संकेत

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहरातील प्रलंबित विकासकामे सोडविण्यासह कचरा, वाहतूक, रस्ते, तसेच नागरिकांच्या इतर दैनंदिन समस्या तातडीने सोडविण्यासाठी महापालिका आयुक्तांकडून ‘पीएमसी स्पार्क’ ही वाॅर रूम सुरू करण्यात आली आहे. मात्र, या वाॅर रूमच्या बैठकांनंतरही प्रकल्प, तसेच दैनंदिन समस्या कायम असल्याने आता महापालिका आयुक्तांकडून प्रशासकीय कारभारात मोठे फेरबदल करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
त्यासाठी महापालिकेतील महत्त्वाच्या खात्यांचे अधिकारी बदलले जाणार असून, कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी हे बदल केले जाणार असल्याचे महापालिका आयुक्तांकडून सांगण्यात येत आहे. वारंवार सूचना देऊनही अनेक विभागप्रमुखांकडून अपेक्षित कामे होत नसल्याने हा निर्णय घेणे अपरिहार्य असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.
महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मागील पाच महिन्यांपासून महापालिका आयुक्तांकडून महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. त्यानंतर आता शहरात प्रत्यक्ष साइट व्हिजिट करून प्रकल्पांबरोबरच शहरातील वाहतूक, कचरा व रस्त्यांची स्थिती पाहणी केली जात आहे. या पाहणीत अनेक ठिकाणी कामेच होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्याच वेळी नागरिकांच्याही मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्यामुळे आयुक्तांनी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकारही वाढविले आहेत.
मात्र, प्रत्यक्षात क्षेत्रीय कार्यालयांकडूनच कामे केली जात नसल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे.अशीच स्थिती महापालिकेच्या काही मुख्य विभागांची असून, येथे असलेल्या अधिकाऱ्यांकडून दैनंदिन कामकाजाकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रत्यक्षात शहरात फिरून नागरिकांशी संबंधित कामे करणे अपेक्षित असताना अधिकारी महापालिकेत ठिय्या मांडून बसल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय आयुक्तांनी सूचना केल्यानंतरही काही विभागप्रमुखांकडून संबंधित कामे केली जात नसून चुकीचे अहवाल सादर केले जात आहेत. त्यामुळे अनेक विभागप्रमुखांवर आयुक्त नाराज असून, आता वेगवेगळ्या विभागांच्या खातेप्रमुखांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची व पुढील काही दिवसांत त्याचे आदेश काढले जाणार असल्याची चर्चा आहे.
“पुणेकरांच्या दैनंदिन समस्यांसह शहरातील महापालिकेच्या सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देणे आवश्यक आहे. मात्र, काही अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता दिसत नाही. त्यामुळे बदल अपरिहार्य असून, लवकरच सक्षम अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या विभागांचा पदभार देण्यात येईल.”
– नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका





