Ajinkya Rahane Record : अजिंक्य रहाणेने झळकावलं अनोखं द्विशतक! विराट-धोनीच्या खास क्लबमध्ये झाला सामील
Ajinkya Rahane Record : कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणे याच्यासाठी अत्यंत खास ठरला आहे, कारण मैदानावर पाऊल ठेवताच तो एका ऐतिहासिक 'द्विशतकाला' गवसणी घातली आहे.

KKR vs SRH Ajinkya Rahane Record 200th IPL Match : आयपीएल २०२६ च्या सहाव्या सामन्यात आज केकेआर आणि एसआरएच हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. हा सामना कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणे याच्यासाठी अत्यंत खास ठरला आहे, कारण मैदानावर पाऊल ठेवताच त्याने एका ऐतिहासिक ‘द्विशतकाला’ गवसणी घातली आहे
भारताचा अनुभवी फलंदाज आणि केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे आज आयपीएलच्या इतिहासात आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धचा आजचा सामना रहाणेच्या कारकिर्दीतील २०० वा आयपीएल सामना ठरला आहे. आतापर्यंत खेळलेल्या १९९ सामन्यांमध्ये त्याने आपल्या फलंदाजीने अनेकदा संघाला सावरले आहे, मात्र आजचा टप्पा त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीची पावती ठरला आहे.
दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री –
Ajinkya Rahane playing his 200th IPL match.#IPL2026
#KKRvsSRH
#TATAIPL pic.twitter.com/UhJsgBif2x— TheFinalOver (@ash25112) April 2, 2026
आयपीएलमध्ये २०० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळणारा रहाणे हा भारताचा ११ वा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी एमएस धोनी (२७८), रोहित शर्मा (२७३) आणि विराट कोहली (२६८) यांसारख्या दिग्गजांनी हा टप्पा ओलांडला आहे. दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, शिखर धवन, आर. अश्विन, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायुडू यांच्यानंतर आता रहाणेचे नाव या यादीत अभिमानाने घेतले जाईल.
अजिंक्य रहाणेची आयपीएल कारकीर्द –
३७ वर्षीय अजिंक्य रहाणेने आतापर्यंत १९९ सामन्यांमध्ये ३०.७१ च्या सरासरीने ५०९९ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतके आणि ३४ अर्धशतकांचा समावेश आहे. १२५ च्या वर स्ट्राइक रेटने खेळणाऱ्या रहाणेने राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांसारख्या मोठ्या फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व केले असून सध्या तो केकेआरची धुरा सांभाळत आहे.
केकेआरला पहिल्या विजयाची प्रतीक्षा –
यंदाच्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्सला अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. अशा परिस्थितीत, आपल्या २०० व्या ऐतिहासिक सामन्यात विजय मिळवून संघाला २ गुण मिळवून देण्याचा रहाणेचा मानस असेल.





