जळगाव जिल्ह्यातील धरणगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असताना मतदारयादीतील घोटाळ्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चिती आणि आरक्षणाच्या कामाला वेग आला असतानाच, मतदारयादीतील अनियमिततेवरून विरोधी पक्षांकडून मुंबईत मोर्चाची तयारी सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर धरणगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवाराचेच नाव मतदारयादीतून गायब झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे ठाकरे गटाला ऐनवेळी नवीन उमेदवार शोधण्याची नामुष्की ओढवली आहे. धरणगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी महिला सर्वसाधारण गटाचे आरक्षण निघाले आहे. या जागेसाठी ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार म्हणून शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांच्या मातोश्री रुखमाबाई रतन वाघ यांचे नाव पक्के मानले जात होते. मात्र, अंतिम मतदारयादीत त्यांचे नावच गायब असल्याचे उघड झाल्यानंतर पक्षात प्रचंड खळबळ उडाली. यामुळे ठाकरे गटाची निवडणूक रणनीती पूर्णपणे कोलमडली असून, आता तातडीने दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. सत्ताधाऱ्यांचा डाव: १०-१२ लाखांचा खर्च करून कटकारस्थान शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते गुलाबराव वाघ यांनी हा प्रकार सत्ताधाऱ्यांचा सुनियोजित डाव असल्याचा थेट आरोप केला आहे. ते म्हणाले,“माझ्या आईसह बहिणीचे नाव मतदारयादीतून हटवण्यासाठी विरोधकांनी १० ते १२ लाख रुपये खर्च करून कटकारस्थान रचले आहे. निवडणूक एकतर्फी करण्यासाठी हा घाट घातला गेला आहे.” वाघ यांनी पुढे म्हटले की, केवळ त्यांच्या कुटुंबीयांचेच नव्हे, तर अनेक ठाकरे गट समर्थकांचे नावही यादीतून हटवले गेले आहे. अधिकाऱ्यांकडे तक्रार, मात्र उडवा-उडवीची उत्तरे या प्रकरणी ठाकरे गटाने तातडीने धरणगाव नगरपालिका मुख्याधिकारी, तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पक्षाने संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याशिवाय, नगरपालिकेच्या मतदार यादीत प्रचंड घोळ असून अनेक प्रभागांमध्ये दुबार नावे, चुकीचे फोटो आणि मतदारांचे वार्ड बदलल्याचे प्रकार आढळत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाने केला आहे. या सर्व प्रकारांमुळे धरणगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. निवडणुकीच्या तोंडावर उघडकीस आलेल्या या घोटाळ्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला असून, मतदारयादी सुधारण्यासाठी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.