Pune News : सीएचबी प्राध्यापकांच्या मानधन वाढीची घोषणा हवेतच विरली; प्राध्यापकांकडून संतप्त भावना व्यक्त
Pune News : वरिष्ठ महाविद्यालयांमधील बहुतांश पदभार सांभाळणाऱ्या तासिका तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापकांच्या मानधन वाढीची घोषणा केवळ कागदावरच राहिल्याने प्राध्यापकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

Pune News : वरिष्ठ महाविद्यालयांमधील कामकाजाचा मोठ्या प्रमाणात भार तासिका तत्वावर (सीएचबी) काम करत असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांवर आहे. कामाच्या तुलनेत मानधन मात्र अतिशय तुटपुंजे मिळत असून या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हे प्राध्यापकांना मुश्किल बनत चालले आहे. (Pune News)
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मानधन वाढीची घोषणा गेल्या काही महिन्यांपुर्वी केली होती. मात्र ही घोषणा घोषणाच ठरली आहे. यामुळे प्राध्यापकांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. (Pune News)
महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांची बहुतांश पदे रिक्तच पडली आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ५ हजार १२ जागा भरण्याबाबत आदेश काढला. मात्र प्रत्यक्षात अद्याप भरती प्रक्रिया फारशी झालीच नाही. महाविद्यालयांनी रोस्टरची, एनओसीबाबतची प्रक्रियाच पुर्ण केली नाही. (Pune News)
याबाबत महाविद्यालयेही उदासीनच आहेत. काही महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापनाचे अंतर्गत वाद असल्याने प्राध्यापकांची भरती प्रक्रिया रखडलेली आहे. पुर्ण वेळ प्राध्यापकांची भरती होत नसल्याने महाविद्यालयांनी अखेर तासिका तत्वावरील प्राध्यापकांची भरती करण्यालाच प्राधान्य दिले आहे. (Pune News)
तासिका तत्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती ही केवळ नऊ महिन्यांसाठीच केली जाते. एका तासिकेला ९०० रुपये एवढेच मानधन देण्यात येते. महिन्याला एकुण ३६ तासिका घेण्याचीच परवानगी असते. कमाल तासिकांच्या मर्यादेनुसार महिन्याला साधारणपणे ३२ हजार ४०० रुपये पर्यंत मानधन मिळते. (Pune News)
दिवाळी व उन्हाळी सुट्ट्यांचे मानधन मिळत नाही. नेट, सेट, पीएच.डी. पात्रता धारण करुनही तुटपुंज्या मानधनावर प्राध्यापकांना महाविद्यालयातील पडेल ती कामे करावीच लागतात. (Pune News)
तासिका तत्वावरील प्राध्यापकांना प्रति तासिका १ हजार ५०० रुपये मानधन मिळावे. संबंधित प्राध्यापकांची नियुक्ती ही अकरा महिन्यांसाठी करावी, मानधन दरमहा वेळेत मिळावे, आदीसह अन्य मागण्यांसाठी विविध प्राध्यापक संघटनांनी अनेकदा आंदोलने केली व शासनाला निवेदनेही पाठविली. (Pune News)
मात्र त्यावर उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून केवळ पोकळ आश्वासनेच देण्यात आलेली आहेत. प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्राध्यापकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. (Pune News)
तासिका तत्वावरील सहाय्यक प्राध्यापकांचे शोषण थांबलेच पाहिजे. तासिका तत्त्वाची शेवटची मानधन वाढ ही मार्च २०२३ मध्ये झालेली आहे. यानंतर कोणतीही मानधन वाढ करण्यात आलेली नाही. तासिका तत्वाचे धोरण बंद करून त्याऐवजी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार समान कामाला समान वेतन देण्याची आवश्यकता आहे.
– डॉ. प्रमोद तांबे, राज्य समन्वयक, नेट – सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समिती





