Maharashtra Budget Session : आजपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या पारंपारिक चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. सत्ताधारी पक्षाची अहंकारी वृत्ती, संविधानाबद्दलचा अनादर आणि राज्यातील ज्वलंत प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष या कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैयक्तिक पत्र पाठवून निमंत्रण दिले असले, तरी सरकारमध्ये लोकशाहीची कोणतीही सभ्यता उरलेली नाही, असा आरोप जाधव यांनी केला. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी कराराचा फटका राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी आणि मच्छिमारांना बसणार असतानाही राज्य सरकारने त्याबद्दल कोणतीही खंत व्यक्त केलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच, अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूबाबत राज्य सरकारने घेतलेली संशयास्पद भूमिकाही बहिष्काराचे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेवरूनही जाधव यांनी सरकारला धारेवर धरले. ई-केवायसीच्या जाचक अटींमुळे अनेक महिला या लाभापासून वंचित राहणार असल्याचे ते म्हणाले. शेतकरी प्रश्नांवर सरपार स्वस्त… काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरले. यवतमाळ आणि मराठवाड्यात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असूनही सरकार सुस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. दावोस येथे झालेल्या सामंजस्य करारांवर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, जर राज्यात एवढी मोठी गुंतवणूक येत असेल, तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता १५०० रुपयांवरून ३००० रुपये का केला जात नाही? केंद्र सरकारकडून राज्याला अपेक्षित असलेला २९,००० कोटींचा निधी अद्याप मिळालेला नाही, यावरून महाराष्ट्राला डावलून गुजरातला झुकते माप दिले जात असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. याशिवाय, नागपूर येथील ६०० एकर वनजमीन अदानी समूहाला स्वस्त दरात भाड्याने देणे आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण प्रकल्पाला परवानगी देणे, यांसारख्या निर्णयांवरूनही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यातील १ लाख ५७ हजार महिला बेपत्ता असल्याची गंभीर आकडेवारी मांडत त्यांनी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला. सरकारची भूमिका दुटप्पी : पाटिल विधान परिषदेतील काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले. ७० लाख तरुणांनी बेरोजगार म्हणून नोंदणी केली असताना सरकार एक लाख कोटी रुपयांच्या शक्तिपीठ महामार्गाचा हव्यास का धरत आहे, असा सवाल त्यांनी केला. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयावरील छाप्याच्या प्रकरणावरूनही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सरकारची भूमिका दुटप्पी असून यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे त्यांनी नमूद केले. एकंदरीतच, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आजपासून सुरू होणारे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.