महाराष्ट्रात लवकरच भाजपाचे सरकार

शिवसेनेच्या मागणीला योग्य उत्तर देणार : भाजपाची अधिकृत भूमिका
नवी दिल्ली : भाजपा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होईल. शिवसेनेच्या मागणीला भाजप नेतृत्व योग्य उत्तर देईल, अशा शब्दात भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहराव यांनी आपली भूमिका मांडली. सत्तेत समान वाटा या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक झाल्यापासून प्रथमच भाजपाने त्याला उत्तर दिले आहे. भाजपाच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
राज्यातील सरकार स्थापनेवरून भाजपा आणि शिवसेनेत शीतयुध्द सुरू आहे. शिवसेनेला प्रत्यक्षात जागा कमी असल्या तरी सत्तेत समान वाटा हवा आहे. मुख्यमंत्रीपदही अडीच वर्ष वाटून घ्यावे, अशी शिवसेनेची मागणी आहे.
महाराष्ट्रात लवकरच भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार येईल. पक्षाच्या धोरणाला या निवडणुकीत जनतेने पाठींबा दिला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या एकत्रित जागांएवढ्या संख्येने फक्त भाजपाचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे जनतेच्या पाठींब्याने महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येईल. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत ते आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असे नरसिंह राव म्हणाले.
शिवसेना नेत्यांनी केलेल्या विधानांची दखल भाजपा नेतृत्वाने घेतली आहे. त्याला योग्य रितीने उत्तर देण्यात येईल, असे ते म्हणाले. नरसिंहराव यांच्या उत्तराने भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेची बोळवण केली जाण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. दरम्यान शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी असे सरकार स्थापन केले जाण्याच्या हालचाली सुरू होतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे, आम्हाला तो मान्य आहे, अशी भूमिका घेतल्याने शिवसेनेच्या बार्गेनिंग पॉवरला खिळ बसल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.





