महाराष्ट्र बंद मागे, पण ठिकठिकाणी आज महाविकास आघाडीकडून मूकनिदर्शने

Maharashtra News| बदलापूर येथे दोन चिमूरड्यांवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर राज्यातून संताप व्यक्त केला जाऊ लागला. बदलापूरमधील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने आज शनिवारी (दि. 24 ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने या बंदला परवानगी नाकारली तसेच “कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी”, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
हायकोर्टाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी न्यायालयाने दिलेल्या या आदेशाचा आदर करत शनिवारचा बंद मागे घेण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. मात्र, शनिवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत मविआचे नेते, कार्यकर्ते हे तोंडाला काळी पट्टी लावून महिला, मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांविरुद्ध मूक निदर्शने करणार आहेत.
शरद पवार यांचे आवाहन
याप्रकरणी काल शरद पवार यांनी ट्विट केले असून त्यामध्ये म्हंटले की, “बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या (दि. २४ ऑगस्ट) रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. Maharashtra News|
हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते.”
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही बंद मागे घेण्यात येत असल्याची घोषणा केली. शनिवारी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते राज्यभर तोंडाला काळ्या पट्ट्या बांधतील, असे पटोले यांनी जाहीर केले. तर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, “मला आनंद आहे की उच्च न्यायालयाने उद्याच्या महाराष्ट्र बंदवर तातडीने निर्णय दिला आहे. महाराष्ट्र बंदबाबत जी तत्परता उच्च न्यायालयाने दाखवली आहे, तशीच तत्परता जे गुन्हे घडत आहेत त्या आरोपींना आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी दाखवावी.” Maharashtra News|
“माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, मात्र न्यायालयाचा आम्ही आदर राखत आहोत. त्यामुळे उद्याचा बंद आम्ही मागे घेत आहोत. उद्याचा बंद मागे घेतला असला तरी राज्यातील शहरांमध्ये, गावांमध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हाताला आणि तोंडाला काळ्या फिती बांधून उभे राहतील”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
त्यानुसार बदलापूरमधील विकृतीच्या निषेधार्थ राज्यातील सर्व शहरे आणि जिल्हा मुख्यालयांतील चौकांत सकाळी ११ वाजल्यापासून एक ते दोन तास तोंडाला काळी पट्टी आणि हातात काळा झेंडा घेऊन आंदोलन करण्याची घोषणा तिन्ही पक्षांनी केली. आज शरद पवार पुणे येथे, उद्धव ठाकरे दादरच्या शिवसेना भवन येथे तर नाना पटोले ठाणे येथे मूकनिदर्शने करणार आहेत.
हेही वाचा :
रामगिरी महाराजांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राज्यात संताप ; मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला, अटकेची मागणी





