Maharashtra Assembly Voting 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज एका टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना आपला मताधिकार बजावता येईल. दुपारी 3 वाजेपर्यंत 45.53% मतदान झाले असून, त्यात गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 62.99%, तर मुंबई शहर विभागात सर्वात कमी 36.34% मतदान झाले आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांच्या एकूण 4136 उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. मात्र, अशातच पुणे जिल्ह्यातील भोसरी मतदारसंघामध्ये अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भोसरी विधानसभेतील साडे सात हजार मतदारांची नावं अचानकपणे गायब झाली आहेत. त्यानंतर मतदारांनी आपला संताप व्यक्त केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे. आठवड्याभारपूर्वी मतदार यादीत असणारी नावं डिलीट झाल्याचा आणि हडपसर, बारामती अशा विविध विधानसभेत नावं टाकल्याचा, दावा मतदारांनी केला आहे. यामागे सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाची मिलीभगत असल्याचा आरोप या मतदारांकडून करण्यात आला आहे. ही साडे हजार मतं एखाद्या उमेदवाराला विजयी करू शकतात. हे पाहता घडल्या प्रकाराबाबत मतदारांनी आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे – अहमदनगर – ४७.८५ टक्के, अकोला – ४४.४५ टक्के, अमरावती -४५.१३ टक्के, औरंगाबाद- ४७.०५टक्के, बीड – ४६.१५ टक्के, भंडारा- ५१.३२ टक्के, बुलढाणा-४७.४८ टक्के, चंद्रपूर- ४९.८७ टक्के, धुळे – ४७.६२ टक्के, गडचिरोली-६२.९९ टक्के, गोंदिया -५३.८८ टक्के, हिंगोली – ४९.६४टक्के, जळगाव – ४०.६२ टक्के, जालना- ५०.१४ टक्के, कोल्हापूर- ५४.०६ टक्के, लातूर _ ४८.३४ टक्के, मुंबई शहर- ३९.३४ टक्के, मुंबई उपनगर-४०.८९ टक्के, नागपूर – ४४.४५ टक्के, नांदेड – ४२.८७ टक्के, नंदुरबार- ५१.१६ टक्के, नाशिक -४६.८६ टक्के, उस्मानाबाद- ४५.८१ टक्के, पालघर- ४६.८२ टक्के, परभणी- ४८.८४ टक्के, पुणे – ४१.७० टक्के, रायगड – ४८.१३ टक्के, रत्नागिरी- ५०.०४टक्के, सांगली – ४८.३९ टक्के, सातारा – ४९.८२टक्के, सिंधुदुर्ग – ५१.०५ टक्के, सोलापूर -४३.४९ टक्के, ठाणे – ३८.९४ टक्के, वर्धा – ४९.६८ टक्के, वाशिम -४३.६७ टक्के, यवतमाळ – ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.