EVM – विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशामागे ईव्हीएममधील फेरफार असल्याचा दाट संशय महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात आहे. पण, ईव्हीएममध्ये फेरफार करता आली असती, तर लोकसभा निवडणुकतही विजय मिळवला असता, असे मत भाजप आणि महायुतीच्या नेत्यांकडून मांडले जात आहे. यातच भाजपचे जुने मित्र असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, महादेव जानकर यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. ईव्हीएम हॅक करता येऊ शकते. लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर बॅलेट पेपर आणावेत, असे म्हणत जानकर यांनी भाजपला आव्हान दिले आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. महादेव जानकर म्हणाले, ईव्हीएम हॅक करता येते. आय एम अल्सो दी इंजिनियर. आय नो दॅट… विमान हॅक करता येऊ शकते, तर ईव्हीएम हॅक करता येऊ शकत नाही का? लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर केंद्र आणि राज्य सरकारने बॅलेट पेपर आणावेत. आम्ही त्यांचे स्वागत करू. साताऱ्यात तीन उमेदवारांना समान मतदान कसे काय पडू शकते? लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर ईव्हीएम बॅन केले पाहिजे. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, माध्यम, उद्योगही सुद्धा भाजपच्या ताब्यात आहेत. चारही स्तंभावर भाजपचे अधिराज्य असेल, तर ही लोकशाही नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. एक-दोन आमदार असलेल्या पक्षांची अवस्था म्हणजे शेपटीही झाकता येत नाही आणि शरीरही झाकता येत नाही. ईव्हीएमच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष हे आमच्यासोबत आले, तर स्वागत आहे. ईव्हीएममुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. त्याला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप जानकर यांनी केला आहे.